महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा आहे. राज्यातील महिलांमध्ये लाडक्या बहीण योजनेची चर्चा सुरु आहे. राज्यातील दीड कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या महिलांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना शिंदे सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जात आहे. शिंदे सरकारने शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. राज्यातील लाभार्थी महिलांना आतापर्यंत तीन हफ्ते देखील मिळाले आहेत. महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत 7500 रुपये आले आहेत. तसेच आता सरकार दिवाळी निमित्त लाभार्थी महिलांना 5500 रुपयांचा बोनस देणार असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 29 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. याच दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना 3000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. विशेष म्हणजे हे पैसे दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त असणार आहेत. लाभार्थी महिलांना दिवळीचा हा 3000 रुपयांचा बोनस ऑक्टोबर म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आणि दिवाळीच्या आधी देणार आहे. तसेच राज्य सरकार काही निवडक महिला आणि मुलींच्या बँक खात्यात आणखी 2500 रुपये देणार आहे. याचाच अर्थ काही महिला आणि मुलींना दिवळीनिमित्त तब्बल 5500 रुपयांचा बोनस मिळणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना ही प्रचंड महत्त्वकांक्षी योजना आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने निवडणुकीचा जुमला म्हणून सरकारने या योजनेची घोषणा केली, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेला महिला आणि मुलींचा भरघोस प्रतिसाददेखील मिळताना दिसत आहे. त्यामुळे हाच प्रतिसाद महायुतीला मतांच्या रुपाने मिळेल का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.