जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडा, राज्य सरकारचे आदेश, सूत्रांची माहिती

| Updated on: Nov 24, 2023 | 2:59 PM

पाणी प्रश्नावरुन महाराष्ट्रातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी एका पत्राचा फोटो ट्विट केला. जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आणि मराठा आंदोलनाचा संबंध या पत्रातून जोडण्यात आल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केलाय. अशोक चव्हाण यांच्या या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता राज्य सरकारने जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडा, राज्य सरकारचे आदेश, सूत्रांची माहिती
Follow us on

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांना दिली आहे. तसेच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट केलेल्या पत्रात कोणतंही तथ्य नाही. मराठवाड्याला हक्काचं पाणी सोडण्यास कोणताही गतिरोध नाही. सरकार सुप्रीम कोर्टाच्या आंदोलनाचं तंतोतंत पालन करणार आहे. मराठा आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेला तर अजिबात अडसर नाही. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पत्रातील सत्यता तपासणार, अशी सरकारची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका पत्राचा फोटो ट्विट केलाय. जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचा आणि मराठा आंदोलनाचा उगाच संबंध जोडला जात असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केलाय. त्यांनी अधीक्षक अभियंताचं पत्र ट्विट केलंय. या पत्रात मराठा आंदोलनाचा आणि जायकवाडी पाणी प्रश्नाचा संबंध जोडण्यात आल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. “उर्ध्व भागातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा काय संबंध आहे? उगाच मराठा आंदोलनाला बदनाम करू नका अन् पाणी सोडण्याचे टाळू नका”, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

‘मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न’

“मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये सुरु आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिल्याची बातमी धक्कादायक आहे. हा मराठा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव आहे. पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे. सदरहू पत्र कोणत्या कारणांमुळे लिहिले गेले, याचा राज्य सरकारने तातडीने खुलासा करावा”, असं अशोक चव्हाण म्हणाले.


“उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीत 8.6 टीएमसी पाणी सोडण्याच्या 30 ऑक्टोबर 2023 रोजीच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता राज्य सरकारने राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावे, अशी आग्रही मागणी मी पुन्हा करत आहे”, असं अशोक चव्हाण म्हणाले.