मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी समोरासमोर होते. महायुती आणि महाविकास आघाडी अशी ही निवडणूक झाली. शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेसने महायुतीला जोरदार टक्कर दिली नाही. या निवडणुकीच्या निकालात महायुतीचा विजय झालेला दिसत आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात अजित पवार यांची कामगिरी दमदार झाली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धोबीपछाड दिली आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर पहिलीच निवडणूक आहे. त्यात अजित पवार यांनी चांगलेच वर्चस्व मिळवले. शरद पवार यांची पिछेहाट झाली आहे. बारामती तालुक्यात अजित पवार यांच्या गटानेच वर्चस्व निर्माण केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित दादा यांची दादागिरी दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण जनता अजित पवार यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर असल्याचे सिद्ध झाले आहे. शरद पवार गटाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
शिवसेनेतूनही एकनाथ शिंदे बाहेर पडत त्यांनी आपला नवीन गट निर्माण केला. निवडणूक आयोगाने त्यांच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता दिली. एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत ही पहिली निवडणूक नव्हती. यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांची कामगिरी चांगली झाली होती. आता मात्र त्यांनी उद्धव ठाकरे गटाला चांगलेच मागे टाकले आहे. ग्रामीण भागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत आल्याचा चांगलाच फायदा झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची रणनीती यशस्वी ठरली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील २३५९ पैकी २२०५ जागांचे निकाल आले होते. त्यात तब्बल भाजपने ७१६ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. महायुतीला १३६९ ठिकाणी विजय मिळवला. महाविकास आघाडीला केवळ ५०३ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीनंतर शहर पक्ष असलेला आरोप भाजप आता पुसून काढत असल्याचे स्पष्ट झाले.