मुंबई, दि. 27 फेब्रुवारी 2024 | हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांत गारपीट अन् पावसाचा फटका बसला. या पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि खान्देशात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अचानकच्या आलेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे काढणीला आलेल्या गव्हासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रब्बी हंगाम काढणीची वेळ आली असताना गारपीट आणि पाऊस पडत असल्याने शेतकरी संकटात आला आहे.
बुलढाणा शहर आणि जिल्ह्यात सोमवारी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. गारांचा खच रस्ते आणि शेतात अनेक ठिकाणी दिसून येत होता. चिखली देऊळगावराजा रोड बर्फाने झाकल्या गेला होत्या. आता शेतातील गहू हरबरा काढणीला आला होता. त्याचे गारपीटमुळे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले.
जळगाव तालुक्यात अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळदार पाऊस तसेच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अमळनेर तालुक्यात सडावण, दहीवद, नगाव, गळखांब, पातोंदा, सावखेडा या गावांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट झाली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तसेच अमळनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये गारपीट झाली. पारोळा तालुक्यात भिलाली गाव तसेच इतर गावांमध्ये तब्बल वीस ते पंचवीस मिनिटं गारपीट झाल्याची माहिती आहे. चाळीसगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका बसला.
अकोला जिल्हासह शहरात विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु झाल्यानंतर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला. राज्यात हवामान विभागाने २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
सोलापूरच्या बार्शीत तालुक्यातील श्रीपत पिंपरीत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात द्राक्षबाग भुईसपाट झाल्या. श्रीपत पिंपरीतील अशोक पिंगळे या शेतकऱ्याची 2 एकर भाग वादळी वाऱ्याने आडवी झाली. ऐन काढणीला आलेल्या द्राक्ष बागेला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना जवळपास 18 ते 20 लाखांचा फटका बसला आहे.
आज हवामान विभागाने २७ फेब्रुवारी रोजी वर्धा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. वाशिम, अकोला, यवतामाळ, बुलढाणा, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यास यलो अलर्ट २७ फेब्रुवारी रोजी दिला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे.