जालना : जालना जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जो परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे तो परिसर सील करण्याते निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. राजेश टोपे यांनी आज जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या (Rajesh Tope instructions to officers on Jalna Corona Situation).
राजेश टोपेंनी अधिकाऱ्यांना दिलेल्या दहा महत्त्वाच्या सूचना
1) जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यूही वाढत आहे. जिल्ह्यात वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्याबरोबरच बाधित रुग्णांच्या सहवासितांचा अचुकपणे शोध घेण्यात यावा. ज्या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत असे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरणारे परिसर पत्रे ठोकून सील करण्यात यावेत.
2) डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसमवेत त्यांचे नातेवाईक थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. प्रत्येक कोविड हेल्थ सेंटर, कोव्हिड केअर सेंटरवर नियुक्त करण्यात आलेल्या पोलिसांनी अधिक दक्ष राहण्याच्या सूचना करत खासगी रुग्णालयातसुद्धा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.
3) यावर्षी मान्सून वेळेत दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या काळात जिल्ह्यात अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर तसेच कोविड केअर सेंटरमध्ये कुठेही पाण्याची गळती होणार नाही तसेच पाणी साचणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना पूर्वीच करण्यात याव्यात.
4) अधिक पाऊस तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे प्रत्येक डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड केअर सेंटरमध्ये वीज पुरवठा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी जनरेटरची सुविधा उपलब्ध करून घेण्यात यावी. तसेच कुठल्याही प्रकारचे शॉटसर्किट होऊ नये यासाठी इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करून घेण्यात यावे.
5) एखाद्या ठिकाणी अधिक प्रमाणात पाऊस झाला आणि रुग्णांना हलवण्याची वेळ आलीच तर अशा प्रसंगी पर्यायी व्यवस्था आधीच तयार ठेवण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.
6) अनेक ठिकाणी सध्या म्युकर मायकोसिस आजाराने बाधित असलेले रुग्ण आढळत आहेत. या आजाराबाबत जाहिरात फलकाच्या माध्यमातून जनजागृती करावी.
7) बाधित असलेल्या प्रत्येक रुग्णांशी डॉक्टरांनी फोनद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करावी. त्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दरदिवशी जाणून घ्यावी. त्यांना उपचाराच्यासंदर्भाने आवश्यक ते मार्गदर्शन करण्याबरोबरच ज्यांना त्रास असेल अशांना तातडीने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावं.
8) कोरोनाबाधित अथवा संशयित रुणांना कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मिळाव्यात. या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णांची दररोज 6 मिनिट वॉकटेस्ट घेण्यात यावी, अशा सूचनाही यांनी यावेळी दिल्या.
9) खासगी दवाखान्यात कोविड बधितांवर उपचारापोटी आकारण्यात येणाऱ्या देयकांचे दर शासनाने ठरवून दिले आहेत. रुग्णांना उपचारापोटी देण्यात येणारी देयके तपासण्यासाठी प्रत्येक खासगी दवाखान्यात परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परीक्षकांकडून प्रत्येक देयक काटेकोरपणे तपासले जाईल. नागरिकांकडून अधिकचे देयक घेतले जाणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची सूचनाही टोपे यांनी केली.
10) ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने निर्बंधामध्ये 1 जून पर्यंत वाढ केली आहे. या निर्बंधांची जिल्ह्यात कडकपणे अंमलबजावणी होईल याची पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात विनाकारण कोणी बाहेर फिरत असेल तर अशांवर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
हेही वाचा : कोरोना काळातही ‘या’ कंपनीकडून 36000 रुपयांची ऑफर, स्वस्तात खरेदी करा बेस्ट फॅमिली कार