मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात काल (14 मार्च) तब्बल 16 हजार 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांचा आकडा दररोज वाढतोय. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होईल की काय? अशी भीती सर्वसामान्य जनतेला सतावतेय. दरम्यान, राज्यात खरंच लॉकडाऊन लागू होईल का? या प्रश्नाचं उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे (Rajesh Tope on Lockdown).
लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री काय म्हणाले?
“टॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग या तीन सूत्रांवर काम करतोय. सर्व सामाजिक, शासकीय कामांना निर्बंध घातले आहेत. काही ठिकाणी नाईट कर्फ्यू , लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. आम्ही लॉकडाऊन करणार नाही. मुंबई आणि राज्यात लॉकडाऊन लावण्याचे कारण नाही. पण शिस्त लावण्यासाठी कठोर निर्बंध लावणार”, अशी भूमिका राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे (Rajesh Tope on Lockdown).
‘राज्यात 30 लाख लोकांना लसी दिल्या’
“कोरोना रूग्ण संख्या वाढतेय. संसर्ग वाढतोय, ही वाढ मागच्या तुलनेत कमी आहे. मृत्यूदर कमी होतोय, संसर्ग मात्र वाढतोय. सध्या रूग्णालयात बेड उपलब्ध आहे. लसीकरणाच प्रमाण वाढविण्याची गरज आहे. आतापर्यंत 30 लाख लोकांपर्यंत लसीकरण झाले आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
वृद्धांनी लस घ्या, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
“लसीचा पुरवठा व्यवस्थित होतोय. राज्यात रोज सव्वा लाख लोकांना लस दिली जात आहे. खासगी रूग्णालयात लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचे आदेश दिले आहेत. 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं. कारण त्यांना जर कोरोना झाला तर त्यांची तब्येत गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे लवकरात लवकर या वयोगटातील लोकांनी लसीकरण करून घ्यावे”, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.
हेही वाचा : पोलीस आयुक्त बदलणार की गृहमंत्री?; वाझेप्रकरणी मोठ्या घडामोडींची शक्यता बळावली