मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरक्ष: थैमान घातले आहे. दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होतोय. देशभरात कोरोनाचा हाहा:कार सुरु असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) देखील येण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर टोपे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या चर्चेत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटला परवानगी देण्यात आल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं (Rajesh Tope says Corona third wave will be came in July and August 2021).
‘तिसरी लाट कदाचित जुलै, ऑगस्टमध्ये अपेक्षित’
“कोरोनाची तिसरी लाट कदाचित जुलै, ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनबाबत परिपूर्ण असलं पाहिजे. तिसऱ्या लाटेआधी ऑक्सिजन नाही हे ऐकून घेतलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या”, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली (Rajesh Tope says Corona third wave will be came in July and August 2021).
‘ऑक्सिजनसाठी जी आज धावपळ सुरु ती तेव्हा होता कामा नये’
“राज्यात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनच्या बाबत परिपूर्ण असलं पाहिजे. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट असला पाहिजे. ऑक्सिजनसाठी आज जी धावपळ सुरु आहे, ती तेव्हा होता कामा नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
‘राज्याला सध्या 1715 टन ऑक्सिजनची पूर्तता’
“राज्याला सध्या 1715 टन ऑक्सिजन लागत आहे. तेवढं पूर्ण ऑक्सिजन पुरवलं जात आहे. रेमडेसिवीरचा वापर मर्यादित प्रमाणात करा. आज दहा ते पंधरा हजार इंजेक्शन गरजेपेक्षा कमी पडत आहे. पण त्याचा अनावश्यक वापर करुन त्याचा रुग्णांचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी”, अशी सूचना आढावा बैठकीत देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात तब्बल 66 हजार 159 नवे रुग्ण
राज्यात आज दिवसभरात तब्बल 66 हजार 159 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले. गेल्या चोवीस तासात तब्बल 771 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 68 हजार 537 रुग्ण बरे झाले. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन असूनही रुग्णसंख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : राज्यातला लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला, कडकडीत बंद होणार, निर्बंधांमध्ये वाढ