पावसाळा सुरु झाला की राज्यातील अनेक शहरांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढतात. परंतु राज्यातील नाशिक शहर डेंग्यूचा हॉटस्पॉट बनला आहे. नाशिक शहरात डेंग्यूचा कहर झाला आहे. नाशिकमध्ये महिन्याभरातच 311 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. यामुळे नाशिक महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. डेंग्यूच्या कहरनंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठकांचे सत्र लावले आहे. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आले आहे. डेंग्यू संदर्भात चाचण्या सुरू केल्या असून डासांचे उत्पत्तीस्थान आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे.
पावसाळा सुरू होताच नाशिक शहरात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे.स्वाइन फ्लूपाठोपाठ चिकुनगुनिया, मलेरिया यासारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहे. त्यातच आता डेंग्यूने मात्र कहर केला आहे. डेंग्यूचे वाढती रुग्ण संख्या पाहता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने देखील गांभीर्याने घेतले आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून पंपाद्वारे फवारणी केली जात आहे. ट्रॅक्टर द्वारे औषध फवारणी होत आहे. शहरभर दूर फवारणी यासारख्या उपयोजना राबविल्या जात असल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील डेंग्यूची अतिगडद छाया होत असताना उशिराने कीट प्राप्त झाल्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयाकडील जवळपास 950 डेंग्यू चाचण्या पूर्ण झाल्या. यामध्ये 80 नवे डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आलेत. गेल्या आठवडा भरापासून डेंग्यू चाचणीच्या किट अभावी हे अहवाल प्रलंबित होते. डेंग्यूची नाशिक शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता आता महापालिकेने पावसामुळे साचलेली पाण्याची डबकी डेंग्यूच्या फैलावास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थान आढळल्यास संबंधित व्यक्तींवर कारवाई केली सुरू केली आहे.
नाशिक शहरात सुरू असलेल्या बांधकाम साइट्स, खाजगी हॉटेलच्या स्विमिंग पूल, शासकीय कार्यालय , एसटी महामंडळाचे आगार, काही खाजगी ठिकाणी डासांची उत्पत्ती स्थाने आढळल्याने नाशिक महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्रति स्पॉट दोनशे रुपये प्रमाणे दोन लाख रुपयांचा दंड महानगरपालिकेने वसूल केला आहे.