महाराष्ट्र पेटला, दिल्लीत आगडोंब उसळला, आधी राजीनामा आता खासदारांचे उपोषण

| Updated on: Oct 31, 2023 | 9:31 PM

गावागावात युवक, महिला शेतकरी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या भावना दिल्लीत मांडणे हे माझं काम आहे. दिल्लीत खासदारांची बैठकही बोलावली होती. जरांगे पाटील यांची तब्बेत ढासळली आहे. राज्याची परिस्थिती देशाला समजावी म्हणून एक दिवस लाक्षणिक उपोषण केले.

महाराष्ट्र पेटला, दिल्लीत आगडोंब उसळला, आधी राजीनामा आता खासदारांचे उपोषण
HEMANT PATIL AND MANOJ JARANGE PATIL
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 31 ऑक्टोंबर 2023 : मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी हेमंत पाटील आता नवी दिली येथील महाराष्ट्र सदनात उपोषणाला बसले आहेत. हेमंत पाटील यांच्या उपोषणस्थळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील भेट देत त्यांचा पाठींबा दिला. तर, खासदार हेमंत पाटील यांनी सुरू केलेल्या या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देण्याकरता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनीही महाराष्ट्र सदनाला भेट दिली. एकूणच राज्यातील पेटलेल्या या प्रश्नाचा आगडोंब आता दिल्लीतही उसळला आहे.

मी मराठवाड्यातील हिंगोली भागाचं प्रतिनिधित्व करतो. गावागावात युवक, महिला शेतकरी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या भावना दिल्लीत मांडणे हे माझं काम आहे. दिल्लीत खासदारांची बैठकही बोलावली होती. जरांगे पाटील यांची तब्बेत ढासळली आहे. राज्याची परिस्थिती देशाला समजावी म्हणून एक दिवस लाक्षणिक उपोषण केले असे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप केला तर…

माझे उपोषण सुरु असल्यामुळे शिवसेना पक्षाच्या बैठकीला मी जाणार नाही. पण, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, असे ते म्हणाले. सगळ्यांच्या एकीमुळे या विषयाचे गांभीर्य दिल्ली दरबारी समजून हा प्रश्न नक्की सुटेल. ही लढाई लोकसभा आणि सुप्रीम कोर्टात अडकली आहे. लोकसभा सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्याचे गांभीर्य लक्षात येईल असे मला वाटत म्हणून मी राजीनामा दिलाय. पंतप्रधान मोदी यांनी यात हस्तक्षेप केला तर हा प्रश्न नक्की सुटेल, असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री शिंदे प्रश्न नक्की सोडवतील

सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्यासाठी काही प्रवृत्ती आंदोलनात घुसवल्या जावू शकतात. त्यामुळे मराठा तरुणांना विनंती आहे की, माझ्यासहित कुठल्याही राजकारण्यांच्या नादी न लागता जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. हा प्रश्न मार्गी लागावा हीच प्रामाणिक इच्छा आहे. मुख्यमंत्री शिंदे हा प्रश्न नक्की सोडवतील असे वाटतं. या प्रश्नाचं गांभीर्य दुसरीकडे जाऊ नये. कोण काय बोललं यावर उत्तर द्यायला मी बांधील नाही असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

संजय राऊत हे मोठे नेते आहेत. त्यांनी मला काल लोकसभेत पाहिलं. त्यांना माझं नाटक वाटत असेल तर त्यांनी स्वतः आधी राजीनामा द्यावा. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत असलेले खासदार, आमदार यांना राजीनामा देऊन स्वतःपासून सुरुवात करावी. उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन याची सुरुवात करावी. या विषयावर लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलावल तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळं तसे अधिवेशन बोलवावं, अशी मागणीही हेमंत पाटील यांनी केली.