मुंबई : आज दिनांक 20 ऑक्टोबर 2022 जाणून घेऊयात राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. आज सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे आज एमसीए कार्यकारिणीची निवडणूक आहे. दुपारी तीन वाजता ही निवडणूक होणार आहे. शरद पवार, आशिष शेलार यांच्या गटाकडून अमोल काळे हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात संदीप पाटील हे उभे आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण 329 सदस्य मतदान करणार आहेत.