लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघ्या काही तासांनी सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानात एकूण 5 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. ही पाचही मतदारसंघ विदर्भातील आहेत. महाराष्ट्रात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार या दिग्गज नेत्यांचं भवितव्य उद्या ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. या पाच जागांमध्ये कोण-कोण महत्त्वाचे उमेदवार आहेत, कोण कुणाच्या विरोधात आहेत, याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
नागपूर लोकसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे खासदार आहेत. नितीन गडकरी यांना या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचं कडवं आव्हान असणार आहे. विकास ठाकरे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. ते 2002 नगरसेवक होते. त्याचवर्षी ते महापालिकेचे महापौर बनले होते. तसेच त्यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची देखील जबाबदारी सांभाळली आहे. विशेष म्हणजे ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचे कट्टर समर्थक आहेत. विलास मुत्तेमवार हे नागपूर लोकसभा मतदारसंघात 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे विकास ठाकरे यांची देखील नागपुरात चांगली ताकद असल्याचं मानलं जातं. यामुळे नितीन गडकरी यांच्यासाठी ही निवडणूक पाहिजे तशी सोपी नाही हे स्पष्ट आहे. तरीही गडकरी यांच्याकडून प्रचारसभांमध्ये आपण विजयी होणार असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.
रामटेक लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत आहे. रामटेकमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी आपलं नशिब आजमवलं आहे. खरंतर काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण रश्मी यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने निवडणूक आयोगाने त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनी पर्यायाने भरलेला अर्ज ग्राह्य धरत ते उमेदवार असतील, असं जाहीर केलं. बर्वे यांना काँग्रेस नेते सुधील केदार यांचा चांगला पाठिंबा आहे. श्याम बर्वे यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राजू पारवे हे उमेदवार आहे. राजू पारवे हे गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. पण त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांना शिवसेनेकडून रामटेकच्या जागेची उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून किशोर गजभिये यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे किशोर गजभिये हे देखील काँग्रेसचे नेते होते. त्यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. ते नितीन गडकरी यांच्या मर्जीतले नेते म्हणून ओळखले जातात. सुनील मेंढे खासदार होण्याआधी नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी भंडारा-गोंदियात आपली राजकीय ताकद वाढवली आहे. सुनील मेंढे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार प्राशांत पडोळे आणि वंचितचे संजय केवट यांचं आव्हान आहे.
गडचिरोली-चिमूर मतदारसंघ हा नक्षली भाग आहे. त्यामुळे या मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान आहेत. तर महायुतीकडून भाजपचे नेते अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचितकडून हितेश मडावी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण या मतदारसंघात काँग्रेसकडून दिवंगत आमदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रतिभा धानोरकर या स्वत: आमदारही आहेत. धानोरकर यांच्या उमेदवारीला पक्षातील स्थानिक नेत्यांचा विरोध होता. पण त्यांनी दिल्लीत जावून पक्षश्रेष्ठींकडे आपली उमेदवारी मागितली होती. प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर हे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार ठरले होते. मोदी लाट असतानाही ते जिंकून आले होते. पण 30 मे 2023 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधननंतर चंद्रपूरच्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी दावा सांगितला होता. पक्षाने प्रतिभा धानोरकर यांना संधीदेखील दिली आहे. पण त्यांना भाजपकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं चॅलेंज असणार आहे. दोन्ही उमेदवार ताकदीचे असल्यामुळे मतदार उद्या कुणाला मतदान करतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.