नाशिक : नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) मंगळवारी (21 एप्रिल) दुपारी ऑक्सिजन लीक (Oxygen Leaked) झाल्याची मोठी दुर्घटना घडली. ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. त्यामुळे तब्बल 22 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुणी आई गमावलं, कुणी पोटचा भाऊ गमावला तर आणखी कुणी जवळच्या माणसाला गमावलं. या दुर्घटनेत 42 वर्षीय प्रमोद नारायण वाळूंकर यांचा मृत्यू झाला. प्रमोद यांच्या मृत्यूची माहिती समजल्यानंतर रुग्णालयाबाहेर त्यांच्या मोठ्या भावाने आक्रोश केला, जीवाच्या आकांताने टाहो फोडला. आपल्या भावाची प्रकृती बरी झाली होती. अवघ्या चार दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळणार होतं. पण भाऊ मृत्यूचा दारात गेला, असं बोलत प्रमोद यांचे मोठे भाऊ रडत होते. मन हेलावून टाकणारं हे सगळं दृश्य होतं (Oxygen tanker leaked at Zakir Hussain Hospital).
‘दोन तास ऑक्सिजन नव्हता, माझा भाऊ तडपून तडपून गेला’
“माझ्या भावाची प्रकृती चांगली होती. नंतर तो सिरिअस झाला. त्यानंतर तो पुन्हा त्यातून बाहेर आला. तो बरा झाला. काल घरातील सगळे त्याला पाहून गेले. चार दिवसांनी त्याचा डिस्चार्ज मिळणार होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं. रिपोर्ट चांगले येत आहेत, असं डॉक्टर सांगत होते. आज मी त्याला जेवणासाठी डबा आणला. मी त्याला जेवून घे भाऊ, असं सांगितलं. तो म्हणाला, पंधरा-वीस मिनिटांनी जेवतो. मी म्हटलं ठिक आहे. तुला जेव्हा भूक लागेल तेव्हा जेव. पण अचानक ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला. दोन तास पुरवठा नव्हता. माझा भाऊ तडपून तडपून गेला. अहो, हाताशी आलेला माझा भाऊ परत गेला”, अशा शब्दात प्रमोद यांचे भाऊ आक्रोश करत होते.
‘दहा दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केलं’
“दहा दिवसांपूर्वी भावाला अॅडमीट केलं होतं. तो रुग्णालयात आला तेव्हा एकदम व्यवस्थित होता. तो चालत आला. माझ्यासोबत गाडीवर आला. व्यवस्थित होता. त्याची ट्रिटमेंट व्यवस्थित चालू होती. ऑक्सिजनचा पुरवठा दोन तास बंद होता. मेन लाईन बंद. त्यानंतर सिलेंडर नाही. सिलेंडर जरी मिळाला असता तर त्याचा जीव वाचला असता. माझा भावाचा जीव वाचलेला. पण हातातून गेला. त्याला आम्ही कसं आणलं ते आम्हाला ठाऊक. पण परत गेला माझा भाऊ”, असं हवालदिल झालेला एक भाऊ रुग्णालयाबाहेर रडत म्हणत होता.
मृतक प्रमोद यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी आणि लहान मुलगी आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या आई देखील त्याच रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांची प्रकृती आज बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. तर प्रमोद यांना चार दिवसांनी डिस्चार्ज मिळणार होता (Oxygen tanker leaked at Zakir Hussain Hospital).
संबंधित व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव, 22 जणांचा गुदमरुन मृत्यू, नेमकं काय घडलं?
Nashik Oxygen Tank Leak Video : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल 22 जणांचा मृत्यू