भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. जामनेर मतदारसंघात एका गावात ते गेले होते. इथल्या एका खराब रस्त्यावरुन महाजनांना दुचाकीनं वाट काढावी लागली. त्यावेळी स्थानिकांनी रस्त्याच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला. भाजपवर येणाऱ्या अडचणींवेळी धावून जाणाऱ्या संकटमोचक मंत्री गिरीश महाजनांवरच रस्त्याच्या संकटामुळे एका गावातून निघून जाण्याची वेळ आली. तरुण मागून रस्ता-रस्ता ओरडत होते, आणि गिरीश महाजन दुचाकीवरुन बसून त्याच खड्ड्यांमधून मार्ग काढत निघून गेले.
2009, 2014, 2019 असे सलग ३ टर्म गिरीश महाजन जळगावातल्या जामनेरचे लोकप्रतिनिधी आहेत. १५ पैकी ७ वर्ष त्यांनी विविध खात्यांचे मंत्री आणि पालकमंत्र्यांचा जबाबदाऱ्या पार पाडल्या. पण तरीही आमच्या गावातले रस्ते ठिक का नाहीत, यावरुन तरुणांनी मंत्री महाजनांना सवाल केला. तरुण ”गिरीशभाऊ महाजन”….”गिरीशभाऊ महाजन” म्हणून आवाज देत होते. पण महाजनांनी त्याकडे दुर्लक्ष करत बाईकवरुन निघून जाणं पसंत केलं.
जामनेरच्या लिहा तांडा गावात भंडाऱ्यानिमित्त महाजन आले होते. या खड्ड्यांमधल्या प्रवासाआधी काही तरुणांनी महाजनांना घेराव घालत प्रश्न विचारले. तिथून निघाल्यानंतर एका मोटरसायकलवर महाजन गावातून बाहेर पडले. तेव्हाही काही तरुण त्यांच्यामागे प्रश्न विचारत धावत होते.
अखेर महाजन जेव्हा रस्त्याजवळ पोहोचले., तेव्हा तरुणांनी पुन्हा महाजनांना खड्ड्यांच्या प्रश्नासाठी अडवण्याचा प्रयत्न केला.
मात्र असं काही घडलंच नसल्याचा दावा गिरीश महाजनांचा आहे. पावसाचं पाणी पडल्यामुळे पाणी साचलं होतं. गावात सर्व कामं सुरु असून मंजुरीही मिळाली आहे. विरोधक यावरुन राजकारण करत असल्याचं मंत्री गिरीश महाजनांचं म्हणणं आहे. मात्र स्थानिक लोक आपण रस्त्याचंच गाऱ्हाणं महाजनांना सांगत असल्याचं म्हटलं आहे.
कामांना मंजुरी दिलीय हे सांगून मंत्री महाजन तर मोकळे झाले. मात्र ज्या रस्त्यानं गिरीश महाजन गावातून निघून गेले. जर त्याच गल्लीतून तातडीच्या वेळी एखादी गरोदर माता…एखादा वृद्दाला नेण्याची वेळ आल्यावर काय होणार याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीय.
जळगाव जिल्ह्यातल्या ११ आमदारांपैकी १० आमदार सत्ताधारी आहेत. एक सोडून ३-३ मंत्री जळगाव जिल्ह्यात आहेत. मात्र राज्यात जर सर्वाधिक खराब रस्त्यांची स्पर्धा भरवली तर त्यात पहिल्या ५ मध्ये जळगाव जिल्ह्याचा नंबर लागेल. हा चोपडा तालुक्यातला चोपडा-शिरपूर रस्ता आहे….जवळ-जवळ अर्धा फूट टायर खोल शिरेल एवढे खड्डे आहेत. त्याची ना स्थानिक आजी-माजी आमदारांना चिंता आहे ना ही जळगावातल्या ३-३ मंत्र्यांना. पुलावरचे कठडे तुटले आहेत. स्लॅप वाहून गेल्यानं पुलाच्या सळया सुद्धा दिसतायत. पण आजवर कुणीही रस्त्याच्या डागडुजीसाठी फिरकलेलं नाही.
दरम्यान, जिथं-जिथं महाजन सध्या भेटी देतायत…तिथं-तिथं ते चर्चेचा विषय ठरत आहेत. बदलापूर प्रकरणात गर्दीतून विचारलेल्या प्रश्नांवर महाजनांची गोची झाली होती. त्यानंतर आता त्यांच्याच मतदारसंघात खड्ड्यांवरुन विचारणा झाली.