Maharashtra MLC Election 2024 : राज्यात सध्या विधानपरिषदेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार मैदानात आहेत. विधानपरिषदेची निवडणुकीसाठी आतापर्यंत 222 आमदारांनी मतदान केले आहे. त्यातच आता भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी दिली आहे. रमेश कदम तुरुंगात असतानाही त्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. त्याच धर्तीवर गणपत गायकवाड यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या प्रकरणामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून ते तुरुंगात आहेत. मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी तुरुंगाबाहेर काढण्यात आले आहे. यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. यावरुन काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना मतदानासाठी परवानगी देऊ नये, असे म्हटले होते.
तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रकाराला विरोध केला होता. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावर प्रतिक्रिया दिली. माझ्यावर खोटे आरोप लावून तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्यावेळीदेखील निवडणूक होती. त्यावेळी मी परवानगी मागितली होती की मला मतदानाची परवानगी द्यावी, मात्र कोर्टाने मला परवानगी दिली नव्हती. भाजपने मात्र लोअर कोर्टाच्या माध्यमातून दबाव टाकून गणपत गायकवाड यांच्यासाठी परवानगी मागून घेतली आहे, असे अनिल देशमुख म्हणाले होते.
या प्रकरणानंतर राज्य निवडणूक आयोगाने गणपत गायकवाड यांना मतदान करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. गणपत गायकवाड यांच जर मतदान यादीत नाव असेल तर त्यांना मतदान करता येईल. गणपत गायकवाड यांची आमदारकी रद्द झालेली नाही किंवा कोर्टाने अद्याप शिक्षाही सुनावलेली नाही. त्यामुळे त्यांना मतदान करता येईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे म्हणणं होतं. अखेर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी दिली आहे. त्यामुळे ते मतदान करु शकणार आहेत.