Maharashtra Rain Updates | महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाकडून ‘ऑरेंज’ अलर्ट जारी

| Updated on: Jun 27, 2023 | 10:09 PM

Maharashtra Rains IMD Monsoon Updates | महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Updates | महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण हवामान विभागाकडून अतिशय मोलाची माहिती देण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर आता मान्सून दाखल झालाय. मुंबई, ठाणे जिल्ह्यासह कोकणात पावसाने गेल्या चार दिवसांमध्ये चांगलीच बॅटिंग केली आहे. तसेच पाऊस पुढचे दोन-तीन दिवस असाच बरसण्याची शक्यता आहे. पण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तो वेगवेगळ्या प्रमाणात बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने बुधवारसाठी (28 जून) सहा जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी केला आहे. या सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये बुधवारी मुसधाळ ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढच्या चार दिवसांमध्ये पाऊस कसा असेल?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 29 जूनला महाराष्ट्रातील पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात 30 जूनला काय परिस्थिती असेल?

हवामान विभागाने 30 जूनसाठी फक्त रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात 1 जुलैला काय परिस्थिती असेल?

हवामान विभागाने 1 जुलैसाठी रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट जारी केला आहे.

राज्यात पावसाची दमदार हजेरी

राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला. महाराष्ट्रात 7 जूनला मान्सून दाखल होईल, अशी आशा होती. पण हा मान्सून 22 जूननंतर दाखल झाला. पाऊस आला नाही म्हणून शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली होती. अनेकांकडून देवाकडे पावसासाठी प्रार्थना केली जात होती. अखेर राज्यात उशिराने मान्सून दाखल झाला. गेल्या तीन दिवसांपासून तो राज्यभरात पोहोचला आहे. पुढचे तीन-चार दिवस तो सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर हवामान विभागाकडून योग्य माहिती देण्यात येईल.