पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज बुधवारी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात शिवाजीनगर येथील ग्रामदैवत रोकडोबा यांचे मंदिरात जावून दर्शन घेत केली. या दौऱ्यात ते शिवाजीनगर मतदार संघातही भेट देणार असल्याचे समजते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज राज्यातली महत्त्वाची शहरे पिंजून काढत आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होत आहे. या निवडणुकीत सध्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरत्या तयारीनिशी उतरेल असा अंदाज आहे.
राज यांचे औक्षण
औरंगाबादहून निघालेले राज ठाकरे पुण्यात पोहचल्यानंतर त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत झाले. सर्वात प्रथम त्यांनी शिवाजीनगर येथील ग्रामदैवत रोकडोबा मंदिर गाठले. येथे त्यांनी रोकडोबाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. राज ठाकरे यांचे यावेळी महिलांनी औक्षण केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग प्रमुख अनिकेत ढगे यांच्या घरी राज ठाकरे यांनी नाश्ता घेतला. ते या दौऱ्यात शिवाजीनगर मतदार संघातही फेरफटका मारणार आहेत. त्यांनी यापूर्वी नाशिक येथील पक्षाच्या जिल्हा संघटनेत बदल केले आहेत. काल औरंगाबादमध्येही अनेक फेरबदल केले. आता पुण्यात काय होणार, याची उत्सुकता आहे.
फेब्रुवारी निवडणुका
राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. नववर्षांत पुन्हा एकदा निवडणुकाचा हंगाम असून, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय धुळवडीची रंगत वाढणार आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालकांमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे.
राज काय बोलणार?
राज ठाकरे यांनी नाशिक आणि औरंगाबादमध्ये बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यातही अंबानी यांच्या घराकडे गाडी कुणी ठेवली, या प्रश्नाचे अजूनही का उत्तर मिळत नाही, असा सवाल केला होता. या प्रश्नाचे उत्तर मिळाले की, फटाक्यांची लड लागेल असे ते म्हणाले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज काय बोलणार याची उत्सुकता आहे.
Nashik| वृद्धेच्या गळ्यावर चाकू ठेवून हिरेजडीत दागिने लुटले; 3 कोऱ्या चेकवर सह्याही घेतल्या