लाडकी बहीण योजनेचं आता काय होणार? तुमच्या मनातल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

| Updated on: Dec 05, 2024 | 8:23 PM

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या प्रश्नावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीण योजनेचं आता काय होणार? लाभार्थी महिलांना किती रक्कम दर महिन्याला मिळणार? याबाबत फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली.

लाडकी बहीण योजनेचं आता काय होणार? तुमच्या मनातल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Follow us on

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर ते आज मंत्रालयात दाखल झाले. यावेळी राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाच्या पहिलाय बैठकीत पुण्यातील एका रुग्णाला उपचारासाठी 5 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिली पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “आम्ही लाडकी बहीण योजना सुरुच ठेवणार आहोत. तसेच या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना 2100 रुपये देणार आहोत. आम्ही बजेटच्या वेळी तसा विचार करु. शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस योग्यप्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच ते आपल्याला करता येतं. त्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आम्ही आश्वासने दिली ते आश्वासने पूर्ण करु. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या करु. निकषांमध्ये असलेल्या लाभार्थींना आपल्याला कमी करायचं नाही. पण निकषांच्या बाहेर असणाऱ्या महिलांनी लाभ घेतला असेल तर, तशा तक्रारी आल्या असतील तर… पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी सन्मान योजना सुरु केली त्यावेळी पहिल्यांदा जे लाभार्थी होते तेव्हा लक्षात आलं की, मोठे शेतकरी हे देखील लाभार्थी होते. त्यामुळे त्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च सांगितलं की, आम्ही निकषात बसत नाहीत. त्यानंतर ती योजना स्थिर झाली. तशाच प्रकारे या योजनेत निकषांच्या बाहेर आमच्या काही बहिणी मिळाल्या तर त्यांचा पुनर्विचार होईल. पण सरसकट पुनर्विचार करण्याचा विषय नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

‘उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या’

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवरही भाष्य केलं. “महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करतो आहे. मात्र महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीवर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे. महाराष्ट्रातील जे राजकीय वातावरण होतं ते आपल्याला योग्य कसं करता येईल, याचा प्रयत्न केला पाहिजे. मी शपथविधीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे अशा सर्व लोकांना मी प्रत्यक्ष फोन करुन त्यांना निमंत्रण दिलं. त्यातील प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं, मला शुभेच्छा दिल्या. काही व्यक्तीगत कारणाने ते येऊ शकले नाहीत. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“मला असं वाटतं, जो राजकीय संवाद महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये, विशेषत: दक्षिणेकडील राज्यांमध्ये जे इतर आहे ते इथेच आहे की, महाराष्ट्रात राजकीय संवाद हा संपला नाही. आपण अनेक राज्यांत बघतो की, दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो तशी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात नव्हती, आजही नाही आणि उद्याही राहू नये, हा माझा प्रयत्न असेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.