मुख्यमंत्री म्हणून नाही तर कार्यकर्ता आणि कॉमन मॅन म्हणून काम केलं – एकनाथ शिंदे

| Updated on: Nov 27, 2024 | 4:05 PM

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत महायुतीत अजून सस्पेंस कायम आहे. असं असताना आज महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक पत्रकार परिषद बोलवल्याने सस्पेंस आणखी वाढला. ते काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

मुख्यमंत्री म्हणून नाही तर कार्यकर्ता आणि कॉमन मॅन म्हणून काम केलं - एकनाथ शिंदे
Follow us on

राज्यातील निवडणूक निकालात महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. निकाल लागून ४ दिवस झाले असले तरी अजून मुख्यमंत्रीपदाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला दिसत नाहीये. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेंस कायम असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.  काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण भेटत आहोत. त्यामुळे मी महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो. आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाईड व्हिक्ट्री आहे.

शिंदे म्हणाले की, ‘गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही. जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केलं, लोकांनी जो विश्वास दाखवला, एकीकडे विकास कामे, जी महाविकास आघाडीने थांबवली होती. ती आम्ही पुढे नेली. त्याचं प्रतिबिंब पाहत आहोत. त्यात मी जात नाही. कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घातली. त्यामुळे हा विजय झाला. हा जनतेचा विजय आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. लाडकी बहिणींचा लाडका भाऊ मी झालो. ही माझी ओळख निर्माण झाली. ही ओळख मी सर्वात मोठी मानतो.’

‘मी पहाटे पर्यंत काम करायचो. दोन तीन तास झोपल्यावर माझी सभा असायची. हे चक्र निवडणुकीभर चाललं. मी ८० ते ९० सभा घेतल्या. मी प्रवासही मोठा केला. पायाला भिंगरी लावून कार्यकर्ता काम करतात तसं मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केलं. मी त्या धारणेत होतो. त्यामुळे मला प्रोटोकॉलचा अडथळा येत नव्हता. त्यामुळे जनतेसाठी काही ना काही केलं पाहिजे असं वाटत होतं.’ असं ही शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राजभवनात पोहोचून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.