नागपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज नागपूर दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून आपला उद्देश, लक्ष्य काय आहे? आपल्यालाय काय करायचं आहे? राज्यातील पोटनिवडणुका यावर त्यांनी भाष्य केलं. “महाराष्ट्रातील अनेक आव्हानं पेलायची आहेत. ओबीसींना त्यांचे हक्क मिळवून देण्याची जिद्द आहे. 14 कोटी लोकांच हित जपण्याची, परिवर्तनाची आगामी 2024 ची निवडणूक जिंकण्याची जिद्द आहे” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
“सरकारची चुकीची धोरणं, सरकारची चुकीच पावलं, या सरकारने चालवलेला भ्रष्टाचार, महिलांवर अत्याचार होतायत, महागाईने जनता होरपळतेय, यामुळे महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. या विषयांवर जनतेला न्याय हवा आहे, विरोधी पक्षनेता म्हणून तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
आडवाणी कोणामुळे राष्ट्रपती होऊ शकले नाहीत?
शरद पवार यांना काँग्रेसने पंतप्रधान बनू दिलं नाही. असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी “लालकृष्ण आडवणी कोणाच्या अंहकारामुळे राष्ट्रपती होऊ शकले नाहीत? कोणाच्या अधोगतीमुळे देश अधोगतीकडे चाललाय? हे देशातील सव्वाशेकोटी लोकांना ठाऊक आहे” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
अजून दुसऱ्याच्या जीवावर किती सत्ता टिकवणार?
“फार मोठ्या विकासाच्या कल्पना करणाऱ्या मोदी सरकारला 10 वर्ष झाली. अजून किती वर्ष आरोप करणार? अजून दुसऱ्याच्या जीवावर किती सत्ता टिकवणार? 10 वर्ष सत्तेत असूनही 26 पक्षांचा टेकू घ्यावा लागतो, हाच तुमचा पराभव आहे. आरोप करण्यापेक्षा उपलब्धी काय ते सांगा?” अशा शब्दात वडेट्टीवार यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.
पोटनिवडणुकाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते काय म्हणतात?
चंद्रपूर आणि पुण्याच्या पोटनिवडणुका होणार नाहीत, याबद्दल वडेट्टीवार यांना विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की. “चंद्रपूर, पुण्याच्या पोटनिवडणुका घेणं उचित नाही. कमी कालावधी उरला आहे. 60 दिवसांचा कार्यक्रम आणि 9 महिने उरलेत, त्यामुळे पोटनिवडणुका न घेण्याच मी समर्थन करतो”
सत्तेत असूनही बच्चू कडू यांना शेतकऱ्यांसाठी आंदोलन कराव लागतय, त्यावर वडेट्टीवार म्हणाले की, “बच्चकडूंना आता कोण ऐकतय, हे कळून चुकलय. बच्चू कडू योग्य निर्णय घेतील ही अपेक्षा आहे”