2 दिवसांआधी महाविकास आघाडीनं गद्दारांचा पंचनामा म्हणत पत्रकार परिषद घेतली आणि त्याच टीकेला महायुतीनं रिपोर्टकार्डनं प्रत्युत्तर दिलं आहे. सव्वा 2 वर्षातली कामं या रिपोर्टकार्डच्या माध्यमातून महायुतीनं मांडली, मात्र रिपोर्टकार्डनंतर, मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडे मोर्चा वळवला. आमच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला डोहाळे लागलेले नाहीत, असा सणसणीत टोला शिंदेंनी लगावला.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करुनच निवडणुकीला सामोरं जा, असं उद्धव ठाकरे वारंवार म्हणत आहेत. 2 महिन्यांआधी दिल्लीत त्यांनी सोनिया गांधींचीही भेट घेतली. मात्र, स्वत: उद्धव ठाकरेंना किंवा इतर कोणताही चेहरा निवडणुकीआधीच जाहीर करण्यास ना काँग्रेस तयार आहे ना शरद पवार. त्यामुळंच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन शिंदे आणि फडणवीसांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे आले आहेत. दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी घाई घाईच्या निर्णयावरुन जेलमध्ये टाकण्याचा इशारा दिला होता त्यावरही मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं आहे.
महायुतीच्या रिपोर्टकार्डमध्ये प्रकल्प, रस्ते, घरकुल योजना, लाडकी बहीणसह शेतकऱ्यांच्या योजनांसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा दाखला देण्यात आलाय. त्याचवेळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना, शिंदेंनी शेजारीच बसलेल्या अजित दादांना साक्षीदार असल्याचा टोलाही लगावला. निवडणुका घोषित होण्याच्या एक दिवसाआधीच मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या पाचही टोलनाक्यावर लहान वाहनांना टोलमाफी करत मास्टरस्ट्रोक लगावला. हा महाविकास आघाडीला अखेरचा झटका दिल्याचं शिंदे म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीनं गद्दारांच्या पंचनाम्यातून शेतकऱ्यांना हमीभाव, जीएसटी, गुजरातला गेलेले रोजगार, महिला सुरक्षेवरुन निशाणा साधला. मात्र 3 दिवसांतच महायुतीनंही रिपोर्टकार्डच्या माध्यमातून विकास कामांचा लेखाजोखा सांगत पलटवार केला. सध्या पत्रकार परिषदेला, पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलं असलं तरी, येत्या काही दिवसांत जाहीर सभांमधून आमना-सामना होईल हे स्पष्ट आहे.