सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) एकूण 5 नगरपंचायतीच्या निवडणुका (Nagar Panchayat Election) काही दिवसांपूर्वी पार पडल्या होत्या. मात्र या पाचही नगरपंचायतीत नगराध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. आज म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी या पाचही नगरपंचायतीतील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी पार पडत आहेत. यामध्ये वैराग, माढा, महाळुंग-श्रीपूर, माळशिरस आणि नातेपुते या नगरपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदाची निवड ही केवळ औपचारिकता राहिली आहे. अत्यंत चुरशीच्या असलेल्या आणि आगामी जिल्हा परिषद आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी निर्णायक ठरणाऱ्या या निवडणुका मानल्या जात होत्या. त्यामध्ये जिल्ह्यातील पाचपैकी तीन नगरपंचायतींवर भाजप आणि पर्यायाने मोहिते पाटील गटाची सत्ता आली होती. त्यामध्ये मोहिते पाटलांचा गड असलेल्या माळशिरस तालुक्यातील महाळुंग-श्रीपूर, माळशिरस आणि नातेपुते या तीन नगरपंचायती आहेत. तर दुसरीकडे माढ्यात कॉंग्रेसचे बहुमत आले आहे. त्यामध्ये दादासाहेब साठे गटाने बाजी मारली होती. तर नव्यानेच स्थापन झालेल्या बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपले वर्चस्व दाखवत निरंजन भूमकर गटाने एकहाती सत्ता हस्तगत केली आहे.
माढा नगरपंचायतीच्या स्थापनेपासून नगरपंचायतीची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. यामध्ये माढ्याच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान साठे गटाच्या मीनल साठे यांना मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्यावेळीही साठे गटाने एकहाती सत्ता हस्तगत करत 17 पैकी 12 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांचा सुपडा साफ करत साठे गटाने नगरपंचायतीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. यामध्ये राष्ट्रवादीला 2 आणि शिवसेनेला दोन जागा मिळाल्या तर भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. दरम्यान आता माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा म्हणून मीनल साठे यांची बिनविरोध निवड झाली आहे. केवळ त्यांच्या नावाची औपचारिकता बाकी आहे.
माळशिर नगरपंचायतीत एक वेगळाच पॅटर्न पाहायला मिळाला आहे. कारण माळशिरस नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. यामध्ये एकूण 17 जागांपैकी 10 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. तर उर्वरीत राष्ट्रवादीचे 2, अपक्ष 3 आणि स्थानिक मविआचे 2 असे बलाबल आहे. यामध्ये मोहिते-पाटील समर्थक असलेल्या आप्पासाहेब देशमुख यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्चित झाले होते. मात्र भाजपमधीलच काही सदस्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता. त्यामुळे राजकीय डावपेचात माहीर असलेल्या आप्पासाहेब देशमुख यांनी स्वत:च्या घरातील पत्नी आणि भावालाही निवडून आणले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांची बहीण निवडून आली होती. त्यामुळे कुटुंबातीलच चार लोक आणि इतर अपक्ष असलेल्या 5 उमेदवारांना सोबत घेऊन आपल्याच पक्षातील सात जणांना विरोधात बसवत स्वत: नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे माळशिरस नगरपंचायतीत एक अजबच चित्र पहायला मिळालेय.
म्हाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी मोहिते पाटील गटाच्या लक्ष्मी चव्हाण बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. कारण या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसने माघार घेतल्याचे पहायला मिळाले आहे. या नगरपंचायतीतही विचित्र चित्र पहायला मिळालेय. कारण भाजप विरूध्द मोहिते-पाटील अशी चुरस झाली होती. त्यामध्ये मोहिते पाटील गटाचे 9 अपक्ष उमेदवार निवडून आले होते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 6 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजप आणि कॉंग्रेसच्या अधिकृत चिन्हावरील प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे इथेही मोहिते-पाटील यांचीच सरशी पहायला मिळाली आहे.
नातेपुते नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाच्याच दोन पॅनलमध्ये चुरशीची निवडणूक झाली होती. त्यामध्ये मोहिते पाटील समर्थक बाबाराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती विकास आघाडी पॅनेलने 17 पैकी 11 जागांवर विजय संपादन केला होता. मोहिते पाटीलांचे दुसरे समर्थक ॲड. बी. वाय. राऊत यांच्या नेतृत्वाखालील नागरी विकास आघाडीने 5 जागा जिंकल्या होत्या तर एक अपक्ष उमेदवार निवडून आले होते. दरम्यान नातेपुतेच्या प्रथम नगराध्यक्षपदी वर्षाराणी उमेश पलंगे यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे.
बार्शी तालुक्यातील नव्यानेच स्थापन झालेल्या वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या निरंजन भूमकर यांनी एकहाती सत्ता स्थापन केलीय. 17 पैकी 13 जागी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपले वर्चस्व राखले तर भाजपला केवळ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे भाजप पुरस्कृत विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांना निरंजन भूमकर यांनी चारी मुंड्या चीत केले. दरम्यान वैरागचे प्रथम नगराध्यक्ष होण्याची नामी संधी निरंजन भूमकर यांना मिळालेली असतानाच मात्र वैरागचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने नगराध्यपदी सुजाता डोळसे यांची बिनविरोध निवड झालीय. केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.
भाजपा – 10
राष्ट्रवादी – 2
इतर व अपक्ष – 5
काँग्रेस -12
राष्ट्रवादी – 2
शिवसेना -2
इतर – 1
भाजपा – 1
राष्ट्रवादी – 6
कॉंग्रेस -1
स्थनिक आघाडी- 9
जनशक्ती आघाडी – 11
नागरी विकास आघाडी – 5
इतर व अपक्ष – 1
संबंधित बातम्या :
नाशिक महापालिकेची एप्रिलमध्ये निवडणूक; मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता?