MPSC Exam Year Calendar 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) २०२५ मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाच्या mpsc.gov.in , mpsconline.gov.in या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली. परीक्षांचे वेळापत्रक तयार करताना विविध दोन परीक्षा एकत्र येणार नाही, त्याची काळजी घेतली गेली असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वेळापत्रकानुसार अभ्यास करणे सोयीचे होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांच्या भरती महाराष्ट्र लोकसभा आयोगामार्फत करण्यात येते. वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. आयोगाकडून हे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी), राज्यातील विविध विद्यापीठे आणि इतर परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेतले आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
आयोगाच्या व विविध संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी आयोगाच्या वेळापत्रकाची प्रत संबंधित संस्थांना पाठवली आहे. त्या संस्थांनी या तारखा टाळून आपल्या परीक्षा घ्याव्या, अशी सूचनाही आयोगाकडून करण्यात आली आहे.