Maharashtra Rain Update : कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार; पावसाच्या सरींना महाराष्ट्र ओलाचिंब

| Updated on: Jun 28, 2024 | 12:34 PM

Maharashtra rain forecast update : आज राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे. तर राज्यात अनेक भागात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजचं हवामान कसं आहे? वाचा सविस्तर...

Maharashtra Rain Update : कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार; पावसाच्या सरींना महाराष्ट्र ओलाचिंब
महाराष्ट्रभर 'मुसळधार'
Image Credit source: ANI
Follow us on

महाराष्ट्रभर पावसाच्या सरी… राज्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. मुंबई शहरात पावसाची दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, उपनगर रायगड आणि ठाणे जिल्ह्यात आज अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनार भागामध्ये नागरिकांना जाण्यास प्रशासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे. तसंच राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी आता धो- धो पाऊस कोसळतोय.

वसई विरार नालासोपारा परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. संपूर्ण परिसरात काळेकुठ ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. जोरदार पाऊस पडतो आहे. मागच्या तीन ते चार दिवसापासून पाऊसाची संततधार सुरु आहे. आजच्या हवामान वातावरून दिवसभरत आणखी
जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही तुरळक सकल भाग सुटले तर शहरातील मुख्य रस्त्यावर कुठेही पाणी साचलं नाही.

विरार-चर्चगेट पश्चिम रेल्वे सेवा तसेच शहरातल्या वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहेत. संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांनी भात पेरणीस सुरवात केली आहे. विरार पूर्व मनवेल पाडा परिसरातील आज सकाळी पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं.

उरण पाणीच – पाणी

उरण परिसराला पावसाने झोडपलं आहे. जोरदार पावसाचा उरण रेल्वे स्टेशनला फटका बसलाय. उरण रेल्वे स्टेशनमध्ये पावसाचं पाणी घुसलं आहे. त्यामुळे प्रवाशांना स्टेशन बाहेर पडताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागच्या वर्षीही अशीच अवस्था असताना रेल्वे प्रशासनाने कोणतेही उपाययोजना केल्याचं दिसत नाही. अंडर ग्राउंडमध्ये पाणीच पाणी झालंय. मार्च 2024 मध्ये नेरूळ ते उरण नवीन लोकल रेल्वे लाईनचं उद्घाटन झालं. त्यानंतर पहिल्याच पावसात उरण स्थानकात पाणी भरल्याने प्रशासनाचे पितळ उघडं पडलं आहे.

यवतमाळमध्ये मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. तर आज सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. तीन ते चार दिवसानंतर पाऊस आल्याने शेतकरी आनंदित आहे. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. नागरिकांची उकड्यापासून सुटका झालीय. दिवसभर पावसाची रिपरिप राहण्याची शक्यता आहे.