डोंबिवली : डोंबिवलीमधील रस्ता (Dombivli Road) पाण्यात अक्षरशः वाहून गेला आहे.त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. 15 दिवसात खड्डे बुजवले नाहीतर मोठे आंदोलन करणार असा इशारा कल्याण जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी दिला आहे. कल्याण-डोंबिवली मधील रस्त्यावर काय ते पाणी, काय खड्डे, काय तो चिखल, मात्र केडीएमसी अधिकारी आणि ठेकेदार ओके मध्ये आहेत, अशीच परिस्थिती झाली आहे. पावसाला (Maharashtra Rain Update) आता कुठे सुरवात झाली नाही तोच डोंबिवली ग्रामीण भागातील भोपर रोडवर मोठे खड्डे पडून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. 27 गावांत अमृत योजने अंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. या कामासाठी हा भोपरचा अर्धा रस्ता पूर्णपणे खोदण्यात आला होता. खोदलेल्या या रस्त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.
गेल्या महिन्यात कंत्राटदाराने या रस्त्याचे डांबरीकरण केले. परंतु हे काम योग्य पद्धतीने न झाल्याने पहिल्या पावसातच रस्त्याची दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. भोपर कमान ते शनी मंदिर पर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. हा रस्ता उतारावर असल्याने रस्त्यावरुन पावसाचे पाणी वहात असते. गतीरोधकांमुळे पावसाचे पाणी साचत असून हे पावसाचे पाणी जाण्यासाठी चक्क गतीरोधकच खोदून पावसाच्या पाण्यास वाट काढून देण्यात आली आहे.
पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यास या धोक्यांचा अंदाज वाहनांना, पादचाऱ्यांना न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कडेला चिखल साचलेला आहे, तर खड्ड्यातील पाणी वाहनांमुळे आजूबाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे.
रस्त्यावरून चालताना वाहन चालकांना त्याचबरोबर पादचाऱ्यांना खड्ड्यांच्या अडथळ्याची शर्यत पार करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.तर 15 दिवसात खड्डे बुजवले नाहीतर मोठे आंदोनल करणार असा इशारा कल्याण जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी दिला आला आहे.