मोहम्मद हुसैन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर : पालघर आगार प्रमुखाला महिला वाहकाने “कानाखाली मारुन दाखवा” या केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या पालघर आगार प्रमुखासोबत झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे.
एसटी वाहक ममता पालवे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पालघर आगार येथे ममता पालवे आंदोलन करत असताना पालघर आगाराचे प्रमुख नितीन चव्हाण आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी ममता पालवे आणि नितीन चव्हाण या दोघांमधील संभाषणाचा व्हिडीओ शूट झाला होता.
काय ऐकू येते व्हिडीओमध्ये?
व्हिडीओमध्ये पालघर आगाराचे प्रमुख नितीन चव्हाण आंदोलनकर्त्यांशी बोलताना दिसतात, मात्र त्यांच्याशी संवाद साधणारी महिला कंडक्टर दिसत नसून, तिचा केवळ आवाज ऐकू येतो.
नितीन चव्हाण – विनाकारण कागद नका मागे लावून घेऊ, मला सहकार्य करा, तुम्ही पण स्वतः हे करु नका, गोत्यात येऊ नका, ड्युट्या करा, आपापल्या ड्युट्या करा, इथे थांबायचं नाही, डेपोत थांबायचं नाही
पार्श्वभूमीवरील पुरुषाचा आवाज – धमकी दिली आम्हाला कानाखाली मारुन दाखवू
पार्श्वभूमीवरील महिलेचा आवाज – मारुन दाखवा ना कानाखाली
नितीन चव्हाण – तो काय बोलतो, खोटं का बोलतो मग
पार्श्वभूमीवरील महिलेचा आवाज – खोटं काय बोलतो म्हणजे, तुम्ही काय साहेब आहेत म्हणजे काहीपण बोलणार का, कानाखाली मारुन दाखवा ना
वाहक ममता पालवे काय म्हणतात?
ती जी क्लीप व्हायरल झाली आहे, ती पूर्णपणे सत्य आहे. आम्ही कोणाला अरेरावीचे शब्द वापरले नव्हते. पण डेपो मॅनेजर प्रत्यक्ष तिथे येऊन सर्व कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. वरुन माझे मिस्टर (वाहक केशव पालवे) यांना त्यांनी कानाखाली मारण्याची धमकी दिली. म्हणून मी त्यांना बोलले की तुम्हाला मारायचं असेल, तर सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही मारा. निलंबित करायचं असेल, तर सर्व कर्मचाऱ्यांना करा, एकाच व्यक्तीवर अन्याय करु नका, असं ममता पालवे यांचं म्हणणं आहे.
पालघर आगार प्रमुख नितीन चव्हाण काय म्हणाले?
आम्हाला दुपारी अडीच-पावणेतीनला एक मेसेज आला. आगार परिसर आणि गेटच्या बाहेर जे काही संपकरी ठाण मांडून बसले आहेत, नारे देत आहेत किंवा गाड्या बाहेर काढू देत नाहीत. काही चालकांनी घाबरुन गाड्या आगारात जमा केल्या. मी त्यांना सांगायला गेलो की इथे बसू नका, हा आगाराचा परिसर आहे. विनाकारण केलंत तर कारवाईला सामोरं जावं लागेल. त्यापेक्षा ड्युट्या करा, लॉस होत आहे. माझ्या कर्मचाऱ्यांना सांगणं माझं काम होतं. पण संबंधित महिलेने विषयाचा अपव्यय करुन ही भूमिका मांडली आहे. त्याचं माझं असं कुठलं इंटेन्शन नव्हतं, उद्देश हाच होता की ड्युट्या निघाव्यात. मी माझ्या कर्मचाऱ्यांना कन्व्हिन्स करत होतो, असा दावा आगार प्रमुखांनी केला आहे.
पाहा व्हिडीओ :
संप चालू ठेवल्यास पगारवाढ रोखण्याचा इशारा
सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee Strike) ऐतिहासिक अशी पगारवाढ देऊनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अद्यापही एसटी कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे आता सरकारने थेट वाढीव पगार रोखण्याचा दम कर्मचाऱ्यांना दिला. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कडक भूमिका घेत पैसे देऊन संप चालू राहणार असेल तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट, आता सरकारला विचार करावाच लागेल, असा इशारा दिला आहे.
संबंधित बातम्या :