राज्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यातच राज्यातील अनेक शहरांचे तापमान चाळीस अंशाच्या वर गेले आहे. काही शहरांनी तापमानाची 45 ओलांडली आहे. यामुळे या शहरांमध्ये अघोषित संचारबंदी दिसून येत आहे. राज्यात जळगाव आणि अकोला शहरे सर्वाधिक हॉट शहरे ठरली आहे. या शहरांचे तापमान अनुक्रमे 45.3 आणि 45.5 अंश सेल्सियस होते.
विदर्भात अकोला सर्वाधिक हॉट शहर ठरले आहे. अकोलाचा पारा 45.5 अंशांवर पोहोचला आहे. यंदाचा उन्हाळ्यातील अकोल्यात गुरुवारी उच्चांक तापमानाची नोंद झाली. तर यवतमाळ 43.05, अमरावती 43.2, चंद्रपूर 43.2, वर्धा 43.02 आणि नागपुरात 41.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवसासाठी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अकोला आणि जळगाव शहर हॉट सिटी म्हणून ओळखले जाते. हॉट सिटीमध्ये दुपारी शहरातील रस्ते सामसूम पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने अजून तीन दिवस तापमान वाढलेले असणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असा सल्ला दिला आहे. कामानिमित्त घराबाहेर पडत असाल तर डोक्यावर टोपी, रुमाल, गॉगल आणि पाण्याची बॉटल घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
धुळे, अहमदनगर, नाशिक, मालेगाव, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, बीड, अमरावती, बुलढाणा, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, यवतमाळ या शहरांचे तापमान 40 अशांच्या वर गेले आहे. वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे, मुंबईमध्ये उन्हाचा फटका नागरिकांना बसत आहे. मुंबईत पारा प्रचंड वाढला असून आरसिटी मॉलमध्ये तापमानात स्नोचा अनुभव घेण्यासाठी गर्दी होत आहे.
मुंबईमध्ये उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. मुलांना सुट्ट्या ही आहेत. त्यामुळे मुंबईमधील कृत्रिम थंडीची ठिकाणे असलेल्या ठिकाणी गर्दी होत आहे. घाटकोपरच्या आरसिटी मॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्नो किंगडममध्ये स्नोचा अनुभव घेण्यासाठी बच्चे कंपनीसह पालकांची मोठी गर्दी होत आहे. या ठिकाणी उणे आठ तापमानात स्नोचा अनुभव घेता येतो. कुलू मनाली किंवा काश्मीरचा अनुभव अवघ्या काही मिनिटांत घेण्यासाठी पालक हा पर्याय निवडत आहे. इथे स्नो सोबत, वेगवेगळे खेळ, स्नो फॉलचा ही आनंद घेता येत असल्याने सुट्टी आणि उन्हाळा म्हणून इथे गर्दी होताना दिसत आहे.