पुणे : उत्तर-मध्यसह देशातील बहुतांश भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्याचवेळी दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, ओडिशासह 10 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे, तर 17 महाराष्ट्रासह राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार आहे. या आठवड्यापासून देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट सुरू होईल. गेल्या वर्षी मे मध्ये देशातील सरासरी तापमान 43.5 डिग्री सेल्सियस होते. ते या वर्षी 39.1 डिग्री सेल्सियस होते. परंतु त्यात वाढ होणार आहे.
राज्यात कसे राहणार तापमान
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाच्या पारात चांगलाच वाढला आहे. या आठवड्याभरात कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातून उष्ण आणि कोरडे वारे वाहत असल्याने अचानक तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवस तापमान जास्त राहणार आहे. मे हिटचा तडाखा अनेक जिल्ह्यांना जाणवणार आहे. जळगावात तापमान पुन्हा 42 ते 43 डिग्री अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. काही दिवस उष्णतेची लाट अशीच राहणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
देशात तापमान वाढणार
राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य भारतात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात पारा ४० अंशांच्या पुढे जाईल. दरम्यान, मंगळवारी राजस्थानच्या बाडमेरमध्ये पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. मध्य प्रदेशात सोमवारी सहा जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर नोंदला गेला.
राज्यात सर्वाधिक तापमान अकोल्यात
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे. अकोल्यात ४२ अंश सेल्सियवर तापमान गेले आहे. जळगाव ४१, वर्धात ४० अंश सेल्सियस तापमान होते. नाशिकमध्ये ३६.५ अंशांवर पारा होता. मुंबई आणि पुणे शहरातील तापमान वाढले आहे. मुंबईचे तापमान ३३.४ अंशांवर तर पुणे ३६.८ अंशावर गेले आहे.
उष्णघातापासून अशी घ्या काळजी
उष्णता टाळायची असेल तर भरपूर पाणी प्या. कारण उन्हाळ्याच्या ऋतूत उन्हात चालल्याने खूप घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी यांचे सेवन करावे. त्याचबरोबर जर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
जास्त वेळ बाहेर राहू नका
उन्हात बाहेर फिरण्यामुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे गरज नसेल तर बाहेर पडू नका. उन्हात जाताना कॅप, ओढणी, रुमालाच्या मदतीने शरीर झाकून ठेवा.