राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर, मंत्रिपदाची खुर्ची वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंनी लॉबिंग सुरु केलीय. मंत्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेवून चर्चा केली. धनंजय मुंडेंनी प्रफुल्ल पटेलांचीही भेट घेतलीय. तर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंसोबत मुंडेंनी फोनवरुन चर्चा केली. विरोधकांसह स्वपक्षीय आणि मित्रपक्षांच्या आमदारांकडूनही मंत्री मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा मागितलाय. सुप्रिया सुळेंनी राजीनामा मागितला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा मागितला. संदीप क्षीरसागरांनी राजीनामा मागितला. बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंनीही मुंडेंचा राजीनामा मागितला. महायुतीचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक आहेत. भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धसांनीही राजीनामा मागितलाय.
2 दिवसांआधी मंत्री धनंजय मुंडे आणि अजित पवारांची 1 तास चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आले. तिथं धनंजय मुंडेंवरुन नेमकं काय करावं, यावरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. चौकशी अहवालानंतर पुढचा निर्णय घेवू असं दादा म्हणाल्याचं कळतंय.
या भेटीगाठी वाढल्या असतानाच आकाचे आका म्हणणाऱ्या सुरेश धसांनीही अजित पवारांची भेट घेतली. त्या भेटीवरुन जितेंद्र आव्हाडांनी धसांना अशा भेटी न करण्याचा सल्ला दिलाय. युद्ध सुरु असताना समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं नाही तर संशय येतो असं आव्हाड म्हणाले आहेत. तर, राजीनाम्याच्या मागणीवरुन सुरेश धसांनी यू टर्नही घेतलाय. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, असं म्हणणारे धस आपण असंच बोललोच नसल्याचं म्हणत आहेत.
इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकरांनी, बोचरी टीका केलीय. नैतिकतेनं मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा होता म्हणत जानकरांनी पुरुष वेश्या अशी टीका केली. नैतिकतेच्या आधारावर मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होतेय.या आधी 4-4 मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना आरोपांनंतर नैतिकतेतून राजीनामा द्यावा लागला होता.