मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. तसंच निर्बंधांच्या विरोधात सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी आदींकडून मोठा विरोध होत असताना राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात 15 ऑगस्टपासून मोठी शिथिलता देण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्याबाबत घोषणा केली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात कोरोना निर्बंधांत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, विवाह सोहळे आदिंना मोठा दिलासा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. (Major relaxation in corona restrictions in Maharashtra since 15 August)
>> 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाला मुभा. मात्र त्यासाठी कोरोना लसीचे दोन डोस आणि दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस होणं गरजेचं आहे. याचा पुरावा दाखवल्यावर प्रवाशांना लोकलचे पास दिले जातील. तसंच बेकायदेशीररित्या प्रवास केल्यास 500 रुपये दंडासह उचित कारवाई केली जाणार आहे.
>> हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना 50 टक्के मर्यादेनं रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वेटिंगला थांबलेले ग्राहक, वेटर, हॉटेल चालक यांनी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.
>> विवाह सोहळ्यांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी 200 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेनं परवानगी देण्यात आली आहे.
>> सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांना तातडीने लस देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
>> खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर 100 टक्के उपस्थितीनं काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल.
>> सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
>> सिनेमागृह , नाट्यगृह , धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.
>> इनडोअर स्पोर्टस सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, खेळाडू आणि चालकांसह सर्वांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं अनिवार्य आहे.
शाळेच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्षण विभाग आणि टास्क फोर्सची बैठक घेणार आहेत. त्यानंतच अंतिम निर्णय घेतला जाईल. तसंच कुलगुरूंकडून अहवाल आल्यानंतर महाविद्यालयाच्या बाबत निर्णय होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
Major relaxation in corona restrictions in Maharashtra since 15 August