मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने (Maharashtra Unseasonal Rain) हाहाकार माजवलेला बघायला मिळाला. या अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना बेजार केलं. गहू, हरबरा, मका, कांद्यासह फळबागांचे प्रचंड नुकसान केलं. अनेक ठिकाणी पीकं अक्षरश: जमिनीवर झोपली. विशेष म्हणजे वादळी वाऱ्यासह गारांचा देखील पाऊस पडला. त्यामुळे शेतात जे काही होतं नव्हतं ते सारं उद्ध्वस्त झालं. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मनातील जखमा ताज्या असताना आता पुन्हा तशाच संकटाचे काळे ढग दाटून येण्याची भीती आहे. कारण हवामान विभागाने याबाबतचा सूचक इशारा दिला आहे.
हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. विदर्भातील काही भागांमध्ये आणि मराठवाड्यातील संलग्न जिल्ह्यांमध्ये 26 मार्चला म्हणजेच उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामानातील स्थितीचा नकाशा आणि सॅटेलाईट चित्र तेच दर्शवत आहे, असं के एस होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील आव्हानं अद्यापही कमी झालेली नाहीत हेच स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे अजूनही चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात पाऊस कोसळतोय.
26 Mar,ह्या 2 दिवसात विदर्भाच्या काही भागात व मराठवाड्यातील संलग्न जिल्ह्यांत मे़घगर्जनेसह पावसाची शक्यता
-IMD
हवामानातील स्थितीचा नकाशा व सॅटेलाईट चित्र तेच दर्शवते.
Satellite obs shows development of thunder clouds ovr parts of Vidarbha & adj Marathwada & east coast states. pic.twitter.com/DV1BngVXh2— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 25, 2023
चंद्रपूर जिल्ह्यात आज अचानक पावसाने हजेरी लावली. चंद्रपुरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अचानक अंधारून आलं आणि पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात विविध तालुक्यात पाऊस बरसतो आहे. अचानक झालेल्या या वातावरण बदलाने नागरिकही आश्चर्यचकित झाले. चंद्रपूर जिल्ह्यात कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली असताना बरसलेल्या या पावसाने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेकडो क्विंटल मिरची ओलीचिंब झाली आहे. सातत्याने पावसात भिजल्याने ती कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर शेकडो हेक्टर शेतीत मिरची पिकाचे उत्पादन घेतले जाते. तोडणी केल्यानंतर काही दिवस मिरची वाळवावी लागते. त्यानंतरच तिची साठवणूक करता येते.
मागील दोन महिन्यांपासून मिरचीची तोडणी सुरू आहे. मिरची वाळू घातली असतानाच पाऊस कोसळत आहे. पटांगणात मिरची वाळू घातली तर पावसाने भिजण्याचा आणि घरात ठेवली तर कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकरी चिंतेत झाले आहेत. शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.