महाराष्ट्रात सध्या हिवाळा सुरु आहे. पण हिवाळ्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये अचानक पावसाची हजेरी लावली आहे. तसेच काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे गरमी देखील वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांना या गरमीपासून आणि अवकाळी पावसापासून कधी मुक्ती मिळेल? याबाबत आम्ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी सध्याच्या हवामानावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. काल नाशिकमध्ये 31 मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या तीन-चार दिवसात सहा ते सात डिग्री तापमान वाढले. वाऱ्याची दिशा बदलली आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. आत्ताची परिस्थिती आहे तशी परिस्थिती पुढील तीन ते चार दिवस अशीच राहणार असल्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होईल”, अशी महत्त्वाची माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली. दरम्यान, राज्यात कालपासून आतापर्यंत कुठे आणि किती पाऊस पडला ते देखील जाणून घेऊयात.
वाशिम शहरासह परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसाने वाशिम बाजार समितीमध्ये एकच धावपळ झाली. हा पाऊस पडत असल्याने तुरीच्या आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात आज मंगरुळपीर बाजार समितीत अचानक झालेल्या वादळी पावसामुळे ओट्याखालील सोयाबीन, तूर आणि इतर शेतमाल भिजला. योग्य साठवणूक सुविधांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मेहनतीने पिकवलेला माल हातचा गेल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून, नुकसान भरपाईसाठी तातडीने मदतीची मागणी केली जात आहे.
नाशिक शहरात काल आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले. तर अनेक ठिकाणी अजून देखील पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेच्या कामापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. काल शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे नाशिक रोड आडगाव पंचवटी द्वारका परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले.. खरंतर दोन ते तीन तास आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय… मात्र 17ते 18 तास उलटून देखील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र आहे तर अनेक रस्ते खड्डेमय झाले… या साचलेल्या पाण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि रस्त्यात पडलेले खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे… पावसाळा संपल्यानंतर डाग तुझी केलेल्या रस्त्यांना पुन्हा पावसामुळे खड्डे पडले
छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आहे. तसेच काही ठिकाणी अचानक पाऊस पडला. या पावसामुळे तुरीसह कांदा रोप आणि अन्य पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जाईल, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.