Maharashtra Weather Update : राज्यात आता हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला आहे. बांगलच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिमाण होणार आहे. राज्यात तापमानात मोठी घट होताना दिसत आहे. रात्रीची थंडी वाढल्याने अनेक जिल्हे गारठले आहेत. पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया अशा जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. कमाल तापमानात १ ते २ अंशांनी घट झालीये. त्यामुळे डिसेंबर महिन्यात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, रात्रीच्या तापमानानंतर काही शहरात कमाल किंवा किमान तापमानात घट होताना दिसत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, पुण्यात कमाल तापमान २८.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते, जे या हंगामातील सर्वात कमी कमाल तापमान होते. तर किमान तापमान १२.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. जे आजपर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान आहे.
नोव्हेंबर महिना सुरु झाल्यापासून तापमानात चढ-उतार होत आहे. आता किमान तापमानात घट झाली असून नीचांकी किमान तापमान १२.२ अंश नोंदले गेले होते. त्यानंतर हळूहळू त्यात १३.६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली, सोमवारी पुण्यात तापमान पुन्हा १२.१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे नोव्हेंबरमधील या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान होते.
Today’s Maharashtra Weather summary from 0830 to 1730 IST@Hosalikar_KS pic.twitter.com/RbXlEDHKEP
— Climate Research & Services, IMD Pune (@ClimateImd) November 26, 2024
२३ नोव्हेंबरला कमाल तापमानात ३० अंश सेल्सिअसवर होते. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी ते २८.४ अंशांपर्यंत घसरले, जे सामान्य पातळीपेक्षा १.५ अंश कमी होते. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम होतोय. त्यामुळे पुढील पाच दिवसात तापमान आणखी घट होणार आहे. असे आयएमडी पुणे यांनी सांगितले आहे. पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. तर दिवसभर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.