नाशिकः महाराष्ट्राच्या भूमीवर पडलेला प्रत्येक थेंब पूर्वेकडे वळविला जाईल. आपल्याकडचे जे पाणी गुजरातला जात आहे ते आपल्याकडे आणले तर नाशिकचाच नाही, तर मराठवाड्याचा देखील प्रश्न सुटेल. त्यामुळे एक थेंब देखील महाराष्ट्रातून गुजरातला देऊ देणार नाही, असा निर्धार मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. संपूर्ण पैसे दिल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीला कोणी हात लावणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, जिल्ह्यातील बंद साखर कारखाने सुरू करण्यास प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. खेडगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा उदघाटन व ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
शेटे यांना कारखाना सल्लागार करा
भुजबळ म्हणाले की, राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील एक अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची विशेष श्रीराम शेटे ओळख आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक, कृषी क्षेत्रात त्यांचा दबदबा असून राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात अनेक कार्यकर्ते घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जडणघडणीत देखील त्यांचा बहुमूल्य वाटा असून नाशिक जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. जिल्ह्यातील कृषी आणि सहकार क्षेत्रात त्यांनी अतिशय महत्वपूर्ण कामे केलेली आहेत. नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्वावर कादवा सहकारी साखर कारखाना अतिशय यशस्वीपणे सुरू राहण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. कादवा सहकारी साखर कारखाना ज्या परिस्थिती मध्ये त्यांनी घेतला आणि तो जिथे नेऊन ठेवला ते महत्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील सर्व बंद केलेले कारखाने सुरू करण्यासाठी श्रीराम शेटे यांना सल्लागार म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. श्रीराम शेटे हे नेहमी एकनिष्ठपणे पवार साहेबांच्या सोबतच राहिले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. नरहरी झिरवळ यांच्या रूपाने अभ्यासू उपाध्यक्ष सभागृहाला मिळाला असल्याचे ते म्हणाले.
‘कादवा’चा कायापालट
उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले की, जेव्हा कादवा कारखाना घेतला तेव्हा परिस्थिती वेगळी होती. मात्र, श्रीराम पवार यांनी कारखाना हातात घेतल्यानंतर त्याचा कायापालट केला. इथल्या गाव, पाडे याचा विकास त्या माध्यमातून केला. काटकसर कोणाकडून शिकावी, तर ती श्रीराम पवार यांच्याकडून शिकली पाहिजे. कारखान्याचे संचालक सुद्धा दुचाकी घेऊन येतात. प्रत्येक गोष्टीत काटकसर हा कारखाना करत असतो असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, भुजबळ साहेब अडचणीत असताना सुद्धा त्यांनी लोकांची कामे थांबवली नाही. जेलमधून देखील ते पत्र व्यवहार करत होते, असे सांगत जिल्ह्यात त्यांनी विविध विकासाची कामे केले जात असल्याचे ते म्हणाले.
नवनवीन प्रयोग करा
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, श्रीराम शेटे यांनी लोकहितासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले असून, या अमृत भूमीत श्रीराम शेटे यांचा सत्कार होत आहे याचा आनंद होत आहे. दिंडोरी, वणीच्या भागामध्ये श्रीराम पवार यांनी केलेले काम खूप मोठे आहे. साखर हा बायोप्रोडक्ट आहे. इथेनॉलची निर्मिती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. विजेवर चालणाऱ्या गाड्या सुद्धा येत आहेत. त्यात इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या सुद्धा येतील. त्यामुळे श्रीराम पवार यांनी नवनवीन प्रयोग करावे. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, डॉ. तुषार शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.