जळगाव : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील मूळ रहिवासी असलेले आणि अफ्रिकेतील जार्डिन मेबल या कंपनीचे मालक उद्योजक सर्वेश श्रीकांत मणियार यांच्यावर काही लोकांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मणियार यांचा दुर्देवी मृत्यू झाला. दक्षिण आफ्रिकेत तंजोम्बातो येथे मणियार आपलं काम आटोपून घरी परतत असताना 10 ते 12 इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी मणियार यांच्या सहकाऱ्याने स्वत:ला त्यांच्या अंगावर झोकून देत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मणियार यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर सहकारीदेखील गंभीर जखमी झाला (Maharashtrian Businessman Sarvesh Maniyar murderd in South Africa).
ही घटना अफ्रिकेच्या वेळेनुसार गुरुवारी (14 जानेवारी) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. मणियार यांचा मृतदेह जोसेफ रावोआन्गी इंड्रियानालोना रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी (15 जानेवारी) सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे भाऊ शैलेश, पत्नी आणि दोन मुलांच्या उपस्थितीत सर्वेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले (Maharashtrian Businessman Sarvesh Maniyar murderd in South Africa).
मयत मणियार हे मूळचे धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी होते. सर्वेश 10 वर्षांपूर्वी अफ्रिकेतील एंटानानारिवो येथे स्थायिक झाले. पत्नी खुशबू, 10 वर्षीय मुलगा श्रीरंग आणि मुलगी इशान्वी यांच्यासोबत राहत होते. तंजोम्बातो येथे जार्डिन मेबल या फर्निचर आणि प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे ते मालक होते.
सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर
या प्रकरणात पोलिसांनी आय.व्ही. कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. फरार संशयिताना शोधण्यासाठी श्वान पथकाची मदत सुरु आहे. सर्वेश यांच्या खूनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वर्णभेदाच्या कारणावरून हा हल्ला झाल्याबाबतही संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच व्यावसायिक स्पर्धेतून हा खून झाल्याचे देखील बोलले जात आहे. घटनास्थळी मणियार यांचा मोबाईलही आढळून आलेला नाही. चोरी झालेल्या वस्तूंचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा : परदेशात शिक्षण घेणाऱ्या संगणकतज्ज्ञाचा 22 हजार महिलांना गंडा, मुंबई पोलिसांची सुशिक्षित ठगाला अटक