सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले. या मुद्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत राजकोट किल्ल्यावर आले. आदित्य ठाकरे आले असताना नारायण राणे त्या ठिकाणी आले. त्यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण किल्ल्यावरील पुतळा कोसळला होता. त्यानंतर नारायण राणे, नितेश राणे बुधवारी पाहणी करण्यास आले. त्याचवेळी आदित्य ठाकरे दाखल झाले. भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या ठिकाणी बॅरीकेटींग केले. तसेच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केले. भाजपचे कार्यकर्ते राजकोट किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करत आहे.
भाजपच्या लोकांनी या ठिकाणी चोरी केली, हे आमच्या अकालनपलीकडे आहे. जगभरात अनेक पुतळे उभारले गेले आहेत. ते सर्व सुव्यवस्थित आहे. परंतु भाजपने आपल्या ठेकेदारांना हे काम देऊन यात चोरी केली, असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. जूनमध्ये डागडुजीसाठी पत्र गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. म्हणजेच अवघ्या सहा महिन्यात पुतळ्याचे काम निकृष्ट असल्याचे समोर आले. आता हे काम करणारा तो आपटे नावाचा मुलगा कुठे आहे? तो फरार कसा झाला? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी जे होते त्यातून चांगलं काही तरी घडेल, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार आदित्य ठाकरे यांनी घेतला. पंधरा मिनिटांत भाजप कार्यकर्त्यांना हटवा आणि आम्हाला मुख्य दरवाज्यातून प्रवेश द्या, असे मागणी महाविकास आघाडीचे नेते याठिकाणी करत आहेत.