महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा घोळ, या जागांवर अजूनही पेच

| Updated on: Oct 25, 2024 | 10:38 PM

Maharashtra election : महायुती आणि महाविकासआघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये अजूनही जागा वाटपाचा पेच कायम आहे. काही जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाही. चर्चा अंतिम टप्प्यात आहे. शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सगळ्याच पक्षाकडून होतोय.

महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा घोळ, या जागांवर अजूनही पेच
Follow us on

महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा घोळ अवघ्या काही जागांवर आलाय. दिल्लीत काँग्रेसची स्क्रिनिंग कमिटीची बैठक झाली. त्यात 55 जागांवर उमेदवारांची चर्चा झाल्याचं पटोलेंनी सांगितलं. म्हणजेच पटोलेंच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घेतल्यास, पहिल्या यादीत काँग्रेसनं 48 नावं जाहीर केली. आता 55 उमेदवारांची नावं निश्चित झाल्याचं पटोले म्हणाले आहेत. म्हणजेच काँग्रेस 103 जागा होतात. 103 काँग्रेसचे उमेदवार गृहित धरल्यास 185 जागा राहतात. याआधी संजय राऊतांनी 85च्या फॉर्म्युल्याची घोषणा केली.

185 मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 85 जागा दिल्यास 100 जागा राहतात. मित्रपक्षांना 10 जागा देण्याचे संकेत मविआनं दिलेत. म्हणजेच काँग्रेस 103, शिवसेना (ठाकरे) 90 आणि राष्ट्रवादी (पवार) 85, मित्रपक्ष 10 असा फॉर्म्युला अंतिम होऊ शकतो. तर समाजवादी पार्टीनं महाविकास आघाडीला एका दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. अद्याप छोट्या मित्रपक्षांना महाविकास आघाडीनं जागा दिल्या नाहीत.
त्यामुळं एका दिवसांत 5 जागा न दिल्यास स्वतंत्र लढून 25 जागा लढणार अशी इशारा अबू आझमींनी दिला आहे.

समाजवादी पार्टीनं आधीच मानखुर्द शिवाजीनगरमधून अबू आझमींना तिकीट दिलं आहे. भिंवडी पूर्व मधून रईस शेख, भिवंडी पश्चिममधून रियाझ आझमी, मालेगाव मध्य मधून शान ए हिंद, आणि धुळे शहरमधून इर्शाद जहागीरदार यांना आधीच तिकीट जाहीर करण्यात आलं

इकडे महायुतीत 11 जागांचाच, तिढा असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. त्यापैकी वरळीचा तिढा सुटला असून इथून मिलिंद देवरा लढणार आहेत. 10 जागांमध्ये वर्सोवाचा तिढा आहे. इथं भारती लव्हेकर भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. पण शिंदेंची शिवसेना या जागेची मागणी करतेय. मीरा भाईंदरमध्ये अपक्ष गीता जैन विद्यमान आमदार असून शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय. भाजपकडून नरेंद्र मेहता इच्छुक आहेत. अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे असून भाजपचे मुरजी पटेल शर्यतीत आहेत.

मानखुर्दच्या जागेसाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिघांमध्ये रस्सीखेच आहे. निफाडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप बनकर आमदार असून भाजपचे यतीन कदम इच्छुक आहेत. कराड उत्तरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. इथं भाजपकडून धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे इच्छुक आहेत. आष्टीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे इच्छुक असून भाजपकडून सुरेश धस शर्यतीत आहेत.

फलटणमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा असून भाजपकडून रणजीत सिंह निंबाळकर रेसमध्ये आहेत. वसई शिंदेंची शिवसेना आणि भाजप दोघांचाही दावा आहे. वरुड मोर्शीतून देवेंद्र भुयार आमदार असून त्यांनी दादांना पाठींबा दिला. पण भाजप दावा सोडण्यास तयार नाही.

29 तारीख उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. पण शनिवार आणि रविवारी अर्ज भरता येणार नाही. त्यामुळं त्वरीत तोडगा काढण्याचं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडे आहे.