maharashtra assembly election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता काही दिवस शिल्लक आहे. त्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम झालेले नाही. महायुतीने उमेदवारी यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली. लोकसभेतील अनुभवापासून धडा घेऊन महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर अजून महायुतीचे 99 जागांवर उमेदवार जाहीर झालेले नाही. त्यातील काही जागांवर अजूनही तिन्ही पक्षांत चर्चा सुरु आहे. तसेच काही ठिकाणी महाविकास आघाडी कोणाला उमेदवार देणार? हे ठरल्यावर जागा वाटप करणार आहे.
मुंबईतील अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार अजूनही जाहीर झाले नाही. त्यात वरळी, शिवडी, चेंबूर, बोरिवली, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, शिवाजीनगर मानखुर्द, अंधेरी पूर्व, वर्सोवा, मुंबादेवी, कलिना, धारावी या मतदार संघाचा समावेश आहे. राज्यातील ३६ मतदार संघात ‘पहले आप’साठी दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले नाही. एकमेकांचे उमेदवार जाहीर होण्याची प्रतिक्षा महाविकास आघाडी आणि महायुती करणार आहे. या ३६ पैकी १३ जागा विदर्भातील आहेत. मेळघाटचे विद्यामान आमदार बच्चू कडूंचा प्रहार पक्ष शिंदेसेनेसोबत आहे. परंतु त्यांना शिंदे सेनेची उमेदवारी मिळाली नाही. ही जागा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा घोळ संपत नाही. आधी ८५ जागांचा फॉर्म्युला आल्यानंतर आता ९० जागांचे सूत्र समोर आले आहे. तिन्ही पक्ष मिळून २७० जागा लढवणार आहे. तसेच उरलेल्या १८ जागा लहान मित्र पक्षांना देण्यात येणार आहे.
मविआमध्ये वर्सोवा, भायखळा, रामटेक, परांडा, श्रीगोंदा, सांगोला या जागेवर वाद आहे. वर्सोवा आणि भायखळाची जागा काँग्रेसला हवी आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. रामटेकच्या जागेवर काँग्रेसचा आग्रह काय आहे. उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली होती.