राज्यात महायुतीचे सरकारमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र समोर आणले जात आहे. परंतु घटकपक्षांमधील नेत्यांमध्ये वाद अन् टीका टिप्पणी सुरुच असते. मतदार संघात वर्चस्व मिळवण्यासाठी कुरघोडी केली जात आहे. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनामधील दोन बड्या नेत्यांचा वाद समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलेले वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच बोचले आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला आहे. रावसाहेब दानवे नुकतेच अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदार संघात गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी हे सिल्लोड आहे की पाकिस्तान? असे वक्तव्य केले होते. त्यावरुन अब्दुल सत्तार समर्थकांनी गुरुवारी सिल्लोड बंदची हाक दिली आहे.
माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सिल्लोड बंदची हाक देण्यात आली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी सिल्लोड शहर बंदची हाक दिली आहे. दानवे यांच्या निषेधार्थ आज मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अब्दुल सत्तार समर्थक नाराज झाले आहेत.
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, मी कुणाच्याही विरोधात दंड थोपटत नाही. राजकारणात नेहमी सतर्क असतो. कुणाचेही दंड थोपटण्याची वाट पाहत नाही. मी लंगोट लावून तयार असलेला पहिलवान आहे. पाकिस्तान मुद्द्यावर लोकांना तीस वर्षांनी आठवण येते. आता मला त्याचे आश्चर्य वाटत आहे.
जालना लोकसभा मतदार संघातून तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवामागे अब्दुल सत्तार असल्याचा जाहीर आरोप रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यानंतर दानवे यांनी सत्तार यांच्याविरोधात मोहीमच सुरु केली आहे. त्यामुळेच अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात जावून सिल्लोड आहे की पाकिस्तान आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.