लाडकी बहीण योजनेचे 1500 नाही तर 3000 रुपये मिळणार? महायुतीमधील बड्या नेत्याच्या एका मागणीने चर्चांना उधाण

| Updated on: Oct 29, 2024 | 6:41 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत येत आहे. ही योजना चर्चेत येण्यामागील कारणही अगदी तसंच आहे. कारण या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जात आहे. पण निवडणुकीनंतर या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 3 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जावी, अशी मागणी आपण करणार असल्याचं महायुतीमधील एका बड्या नेत्याने म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजनेचे 1500 नाही तर 3000 रुपये मिळणार? महायुतीमधील बड्या नेत्याच्या एका मागणीने चर्चांना उधाण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Follow us on

महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 2 कोटी महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. विरोधकांकडून ही योजना निवडणुकीचा जुमला आहे, असा आरोप केला जातो. निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. दुसरीकडे महायुतीचे आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये नाही तर 3000 रुपये मदत मिळावी, अशी मागणी आपण सरकारमध्ये आल्यावर करणार असल्याचं म्हटलं. त्यामुळे महिलांना आता खरंच लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला 3000 रुपये मदत मिळते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य आज केलं आहे.

“सगळी सोंग करता येतात. पण पैशांचे सोंग करता येत नाही. दीड-दोन हजार कोटींचा निधी मी माझ्या आमदारांना दिला आहे. लोकसभेला मागासवर्गीय मते आम्हाला मिळाली नाहीत. कारण संविधान बदलणार म्हणून सांगितले, संविधान बदलण्याचा नेरिटीव्ही सेट केला. शेतकऱ्यांना नुसतं विज बिल माफ केलं नाही. झिरोचं बिल दिलं आहे. आमचा नुसता आवाज नाही, तर आमचं काम चालतं. आम्ही चुकलो होतो, पण आमच्या लक्षात आल्यावर आम्ही सुधारलो ना, म्हणून 2 कोटी 30 लाख लाडक्या बहिणींना लाभ दिला. बहिणींनी आम्हाला राखी बांधली म्हणून आम्ही ओवाळणी दिली आणि ओवाळणी दिल्यावर बहीण भाऊ कधी काढून घेतो का?”, असा सवाल करत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, असं आश्वासन दिलं. ते सांगलीच्या तासगाव येथील सभेत बोलत होते. “आता माझ्या महिला-भगिनींना सांगितले आहे की, ते घड्याळाचे बटन दाबतील, ते धनुष्यबाणाचे आणि कमळाचे बटन दाबतील, कारण ही योजना पाच वर्षे चालवायची आहे. योजना बंद करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का?”, असा सवाल अजित पवारांनी केला.

रवी राणा काय म्हणाले?

“माझ्या लाडक्या बहिणीला 1500 रुपयांच्या आर्थिक मदतीऐवजी 3000 रुपयांची आर्थिक मदत झाली पाहिजे. मी ज्या गरीबीतून या ठिकाणी पोहचलो ते मी विसरलो नाही. गरीबीची जाण मला आहे. गरिबी आली तर माजू नका आणि श्रीमंती आली तर लाजू नका. मी सरकारमध्ये बसल्यावर मागणी करेल, लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 3 हजार रुपयांची आर्थिक मदत करा”, असं मोठं वक्तव्य रवी राणा यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

रवी राणा यांचा विरोधकांवर घणाघात

दरम्यान, रवी राणा यांनी विरोधकांवरही घणाघात केला. “अनेक अयरेगयरे या निवडणुकीत उभे आहेत. हे पाच वर्ष दिसत नाहीत. आम्ही पाच वर्षे जनतेत फिरत असतो. लोकांचे काम करत असतो. माजी खासदार नवनीत राणा यांचा जो पराभव झाला तो सगळ्यांच्या जिव्हारी लागला. अनेक अयरेगयरे उभे राहिले आणि मतांचे विभाजन झाले होते. जे खासदार म्हणून निवडून आले, ना त्यांचा पत्ता आहे, ना त्यांच्या घराचा पत्ता आहे. असा खासदार निवडून आला की ज्याचा कुठेही पत्ता नाही आहे. जे नवणीत राणांसोबत झालं ते आपल्यासोबत नको व्हायला यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. मी कुठल्या नेत्यांसमोर झुकत नाही म्हणून नवनीत राणा विरोधात एकत्र झाले होते. जोपर्यंत ही जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत माझ्या केसाला कोणीही धक्का लाऊ शकत नाही. मी सर्वसामान्य जनतेचा आमदार आहे. जातीपातीच्या समोर जाऊन मी लोकांसाठी काम करणारा आमदार आहे”, असं रवी राणा म्हणाले.

“बडनेरा मतदारसंघात काही नेत्यांनी एक वेगळी युती केली आहे. अनेक जण उभे रहात आहेत. मतांचे विभाजन करण्याचे काम केलं जाईल. मी सर्वसामान्य जनतेचा आमदार आहे. जातीपातीच्या समोर जाऊन मी लोकांसाठी काम करणारा आमदार आहे. बडनेरा मतदारसंघात काही नेत्यांनी एक वेगळी युती केली आहे. अनेक जण उभे राहत आहेत. मतांचे विभाजन करण्याचे काम केलं जाईल”, असा दावा रवी राणा यांनी केला.