महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवस मुख्यमंत्रीपदावरुन सस्पेंस कायम होता. पण आज भाजपच्या विधीमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेता म्हणून निवड झाली आणि सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी उद्या पार पडणार आहे. पण त्यांच्यासोबत आणखी काही मंत्र्यांचा शपथविधी होईल का याबाबत अजून काहीही समोर आलेले नाही. असे असले तरी महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु झाली आहे. कोणात्या पक्षाला कोणती खाते मिळणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं असताना कोणत्या नेत्यांना कोणते मंत्रिपद मिळणार याबाबत ही उत्सुकता लागली आहे.
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गेल्या २ दिवसांपासून आपल्या आपल्या नेत्यांची भेट घेत होते. महायुतीच्या या मंत्रिमंडळात काही जुन्या आणि काही नव्या आमदारांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे, गणेश नाईक, राहुल नार्वेकर, अतुल भातखळकर, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ या नावांची चर्चा आहे.
राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून दीपक केसरकर, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मंत्रीपदासाठी काही अटी ठेवल्या आहेत. या अटी पूर्ण करणाऱ्या आमदारांनाच मंत्रीपद दिले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले होते. लोकसभा निवडणुकीतील कामगिरी, पक्षाचे प्रामाणिकपणे केलेले काम यावरुन आमदारांना मंत्रीपद दिले जाणार आहे. याशिवाय मंत्रालयात कामगिरी कशी होती, मंत्रायलयात किती वेळ उपस्थित होते, आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती, निधीचे वाटप कसे केले असे वेगवेगळे निकष ठेवण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या नेत्यांच्या कामाचा देखील आढावीा घेतला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये त्यांचा सहभाग कसा होता. ते कोणत्या वादात अडकले होते का याबाबत आढावा घेतला जाणार आहे. सर्वांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या आमदारांना मंत्रिपद मिळेल. यावेळी तरुण आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल अशी शक्यता आहे.
महायुतीचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेला 10 ते 12, राष्ट्रवादीला 8 ते 9 आणि भाजपला 20 मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.