मोठी बातमी! महायुतीचं उद्या जागावाटप पक्कं? राजकारणात पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

| Updated on: Mar 10, 2024 | 11:26 PM

महायुतीच्या जागावाटपावर उद्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जागांचा तिढा मिटून उद्या सन्मानजनक संधी मिळेल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय. विशेष म्हणजे उद्या महायुतीची दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे.

मोठी बातमी! महायुतीचं उद्या जागावाटप पक्कं? राजकारणात पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Follow us on

मुंबई | 10 मार्च 2024 : महायुती आणि मविआ दोघांचाही जागावाटपाचा तिढा पुढच्या ४८ तासात मिटण्याची चिन्हं आहेत. दोन्हींकडून दावे होतायत की जागावाटपाची चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात होतेय. मात्र आधी कोण उमेदवार जाहीर करणार, याची दोघांकडून वाट पाहिली जात असल्याचं बोललं जातंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंच्या मते जागावाटपाची ८० टक्के चर्चा पूर्ण झालीय. दोन्ही घटकपक्षांना भाजप सन्मानजनक जागा देणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, परभणीची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची चिन्हं आहेत. विशेष म्हणजे महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी उद्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पुन्हा दिल्लीला जाणार आहेत. तिथे त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत जागावाटपावर चर्चा होणार आहे.

परभणी लोकसभेतून सध्या ठाकरेंचे खासदार आहेत. या लोकसभेत जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी, जालना, परतूर आणि घनसावंगी असे ६ मतदारसंघ येतात. 2019 ला शिवसेनेचे संजय जाधवांविरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश विटेकर लढले होते.
शिवसेनेच्या संजय जाधवांना 5,38,941 तर राष्ट्रवादीच्या विटेकरांना 4,96,742 मतं पडली होती. निकालात संजय जाधव जिंकले. विटेकरांचा 42,199 मतांनी पराभव झाला., त्यांच्या पराभवात वंचितचा हात राहिला. वंचितच्या आलमखीर मोहम्मद खान यांनी 1,49,946 मतं घेतली होती. यावेळी राजेश विटेकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असल्यानं परभणीची जागा त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूनं ज्या उमेदवारांची नावं फिक्स झाल्याची चर्चा आहे, त्यात मविआनं आघाडी घेतलीय.

मविआचे 13 तर महायुतीचे 3 उमेदवार फिक्स

मिळालेल्या माहितीनुसार, मविआचे 13 तर महायुतीचे अद्याप 3 उमेदवार फिक्स झाले आहेत. मविआत फिक्स मानल्या जात असलेल्या उमेदवारांपैकी बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभेतून अमोल कोल्हे, ठाण्यातून राजन विचारे, मावळ लोकसभेतून संजोग वाघिरे, धाराशीव लोकसभेतून ओमराजे निंबाळकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतून विनायक राऊत, दक्षिण मुंबई लोकसभेतून अरविंद सावंत, रायगडमधून अनंत गीते, परभणी लोकसभेतून संजय जाधव, साताऱ्यातून श्रीनिवास पाटील, नाशिक लोकसभेतून विजय करंजकर, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, तर कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी पक्की मानली जातेय. तर महायुतीत बारामतीतून सुनेत्रा पवार, मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे तर बीडमधून पंकजा मुंडेंची उमेदवार खात्रीशीर मानली जातेय.