महायुतीचा तिढा सुटला, तीनही जागा शिंदेंच्या शिवसेनेला? सूत्रांकडून मोठी बातमी

| Updated on: Apr 17, 2024 | 10:38 PM

ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जागांवरुन महायुतीत तिढा सुटल्याचं कळतंय. तिन्ही जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार हेमंत गोडसे, भुमरे आणि प्रताप सरनाईकांची लॉटरी लागू शकते.

महायुतीचा तिढा सुटला, तीनही जागा शिंदेंच्या शिवसेनेला? सूत्रांकडून मोठी बातमी
महायुती
Follow us on

महायुतीत ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागांचा तिढा सुटला असून आता औपचारिक घोषणा शिंदेंचे मंत्री दीपक केसरकर पत्रकार परिषद घेवून करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याचं कळतंय. सर्वाधिक रस्सीखेच सध्या नाशिकवरुन सुरु आहे. त्यातच अचानक भुजबळांनी एंट्री केल्यानं महायुतीतल्या तिन्ही पक्षांची स्पर्धा वाढली. पण ही जागा शिंदेंचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनाच सुटल्याची माहिती आहे. गोडसेंनीही नाशिकची जागा प्रभू रामचंद्राच्या धनुष्यबाणासाठीच सुटेल असं म्हटलंय.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंचे मंत्री संदीपान भुमरेंनी, स्तंभपूजन करत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करत स्वत:च्याच उमेदवारीचे संकेत दिले आहेत. संभाजीनगरमध्ये भाजपचे भागवत कराड आणि भुमरेंमध्ये स्पर्धा आहे. पण ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला जात असल्यानं भुमरेच उमेदवार असतील असं कळतंय. तसं झाल्यास भुमरेंचा सामना ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरेंशी असेल.

ठाण्यात प्रताप सरनाईकांची तयारी सुरु

ठाण्याची जागाही शिंदेंच्या शिवसेनेच्या पारड्यात पडल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गृह जिल्हा आहे. त्यामुळं ही जागा शिंदेंसाठी प्रतिष्ठेची आहे. ठाण्यातून शिंदेंचे आमदार प्रताप सरनाईकांना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. प्रताप सरनाईकांनी उमेदवारीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु केलीय. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या तिन्ही पोलीस आयुक्तालयांमधून गुन्ह्यांची माहिती मागिवलीय. निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात गुन्ह्यांची माहिती देणं आवश्यक आहे, त्यासाठी दाखल गुन्ह्यांची माहिती सरनाईकांनी मागवून घेतली.

कुणाला किती जागा?

ठाण्याचे भाजपकडून आमदार संजय केळकरांनीही इच्छा व्यक्त केलीय. ठाण्यातील भाजपच्या आमदारांची संख्या पाहता, भाजपलाच ठाण्याची जागा मिळावी, असं केळकरांनी म्हटलंय. भाजपनं आतापर्यंत 24 जागा जाहीर केल्या आहेत. अजित पवार गटानं 4 जागा जाहीर केल्या आहेत. परभणीत जानकरांना 1 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेनं आतापर्यंत 9 जागा जाहीर केल्यात. त्यामुळे कोणाचा कोट्यात आणखी किती भर पडते? हेही केसरकरांच्या पत्रकार परिषदेनंतर दिसेल.