नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात असल्याने महायुतीतील बेबनाव समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांच्यामुळे माजी मंत्री छगन भुजबळ यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकचे आजी-माजी पालकमंत्री समोरासमोर उभे ठाकले आहेत.
लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पिछेहाटमुळे एकीकडे महायुतीत अस्वस्थता आहे, तर दुसरीकडे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील महायुतीतला बेबनाव समोर आला आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट या दोघांनी आपले उमेदवार दिल्याने या निमित्ताने नाशिकचे थेट आजी-माजी पालकमंत्रीच समोरासमोर उभे ठाकणार असे चित्र आहे. शिंदे गटाकडून एकीकडे किशोर दराडे उमेदवारी करत असताना अजित दादा गटाकडून महेंद्र भावसार यांना देखील चाल देण्यात आल्याने महायुतीत अस्वस्थता बघायला मिळते आहे.
नाशिकमध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत भुजबळांनी दांडी मारत आमचा उमेदवार असताना आम्ही त्याचाच प्रचार करणार, असं स्पष्ट केल्याने संघर्ष निश्चित असल्याचा चित्र स्पष्ट झालं आहे. कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, असं अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांनी स्पष्ट केल्याने वाद पेटल्याचं बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या उमेदवाराकडून देखील महायुती एक संघ असून वेळेवर अजित दादा गटाचा उमेदवार माघार घेईल, असा दावा केला जात आहे.
महायुतीच्या या गोंधळाचा फायदा उचलण्याचा पुरेपूर प्रयत्न ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्याकडून सध्या केला जातो आहे. आपसातील प्रश्न सोडवू शकत नाहीत ते शिक्षकांचे प्रश्न कसे सोडवणार? असा टोला गुळवे यांनी लगावला आहे. तर प्रस्थापितांना धक्का देऊन त्यांची मुजोरीच संपुष्टात आणण्याच आवाहन अपक्ष उमेदवार कोल्हे यांनी केलं आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत बेबनाव असल्याच बघायला मिळत आहे. अशात आता छगन भुजबळ आणि दादा भुसे यांच्यासारखे दिग्गज नेते जर एकमेकांसमोर प्रचार करू लागले तर आगामी काळात हेच चित्र विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा गोंधळ रोखण्यासाठी महायुतीचे वरिष्ठ नेते काय प्रयत्न करतात? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.