महायुतीला निवडणुकीत कशाची चिंता? अमित शाह यांनी केलं सावध

| Updated on: Oct 24, 2024 | 6:35 PM

महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यातील जागा वाटपाची चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे, सगळ्याच जागांवर लवकरच उमेदवारांची घोषणा होईल. दिल्लीत महायुतीच्या जागावाटपाचे अंतिम टप्प्यात असताना गृहमंत्री अमित शाह यांना महायुतीतील तिन्ही पक्षांना एका गोष्टीबाबत अलर्ट केले आहे.

महायुतीला निवडणुकीत कशाची चिंता? अमित शाह यांनी केलं सावध
Follow us on

महाराष्ट्रातील निवडणुका जिंकणं महायुती किंवा महाविकास आघाडीसाठी इतकं सोपं नाही. दोन्ही आघाड्यांमध्ये तीन मोठे पक्ष आहेत. त्यामुळे ही निवडणूक दोन पक्षांमध्ये नसून दोन आघाड्यांमधील आहे. निवडणुकीत दोन्ही आघाड्यांमध्ये कांटे की टक्कर होणार आहे. पण निवडणुकीपूर्वी अनेक बैठकांच्या फेऱ्यांनंतर दोन्ही आघाडींमध्ये जागांबाबत सहमती झाल्याचे दिसतंय. महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीचे ही जागावाटप पूर्ण झाल्याचं कळतंय.

अमित शहा महायुतीच्या नेत्यांना काय म्हणाले

एकीकडे जोरदार खडाजंगी झाल्यानंतर बुधवारी महाविकास आघाडीतील जागांवर बैठक झाली आहे २७० जागांबाबत एतमत झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तर दुसरीकडे महायुतीची बैठक आज दिल्लीत झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. भाजपने महाराष्ट्रात आपली ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून काही जागांबाबत अजून चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहा यांच्या भेटीला पोहोचले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत अमित शाह यांनी निवडणुकीदरम्यानच्या जागांबाबत तसेच बंडखोरांबाबत विशेष सूचना दिल्या आहेत.

हरियाणा निवडणुकीत भाजपने सर्वांना चकित करत विजयाची हॅटट्रिक मारली होती. या निवडणुकीत भाजपने बाजी मारली पण बंडखोरांमुळे चिंता वाढल्या होत्या. हरियाणात तिकीट न मिळालेले अनेक नेते बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढले. पक्षाविरोधात जाऊन त्यांनी रॅली काढल्या.

महाराष्ट्रासंदर्भात गुरुवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत अमित शहा यांनी बंडखोरांबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सल्ला देताना अमित शहा म्हणाले की, महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांच्या बंडखोरांनी निवडणूक लढवू नये. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या पाहिजेत.

महाराष्ट्रात सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र सत्तेत आहेत. तर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकासआघाडीत विरोधी पक्षात आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.