Malegaon Assembly Constituency: यंत्रमाग उद्योगाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालेगाव शहराचे नाव ऐकताच दंगल आणि बॉम्बस्फोट असे चित्र उभे राहते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे प्रमुख शहर आहे. यंत्रमाग उद्योगामुळे हे शहर प्रसिद्ध आहे. हा उद्योग कसा वाढला? त्याची बिजे स्वातंत्र्यापूर्वी काळात आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटीश सरकारने उत्तर प्रदेशातील विणकरांवर अत्याचार सुरू केले होते. त्यामुळे विणकरांना नवीन ठिकाणाचा शोध घ्यावा लागला. मग हजारो विणकरांनी मालेगाव शहरांमध्ये येऊन आपले बस्तान मांडले. त्यानंतर ते या ठिकाणचे झाले. त्यांनी या ठिकाणी यंत्रमाग उद्योग उभारले. दंगलीचा काळा इतिहास या शहरास आहे. यामुळे कोणत्याही निवडणुकीत मालेगावकडे विशेष लक्ष असते. संवेदनशील असलेल्या या शहरात मालेगाव मध्ये आणि मालेगाव बाह्य असे दोन मतदार संघ येतात. मालेगाव मध्य मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेचे वार्ड येतात. मालेगाव मध्य हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो. तर मालेगाव बाह्य मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर, करंजगव्हाण, झोडगे, दाभाडी, सौंदाणे, मालेगाव ही महसूल मंडळे आणि मालेगाव महानगरपालिकेचे वॉर्ड १ ते ७, २१ ते २५ येतात. हा मतदार संघही धुळे लोकसभा मतदारसंघात येतो.
मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य या दोन मतदार संघात खूपच फरक आहे. मालेगाव मध्य मतदार संघात पूर्णपणे मुस्लिम बाहुल वस्ती आहे. दुसरीकडे मालेगाव बाह्य मतदार संघात हिंदू वस्ती आहे. एका ठिकाणी काँग्रेस, एआयएमआयएमचे तर दुसऱ्या मतदार संघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. मालेगाव बाह्य या मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून विद्यामान मंत्री आणि शिवसेना उमेदवार दादाजी भुसे यांची ‘दादा’गिरी आहे. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत दादाजी भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत हिरे आणि भाजपचे प्रसाद हिरे यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी या मतदार संघावरील वर्चस्व सोडले नाही. २००९ मध्ये ते शिवसेनेत दाखल झाले. मग २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांचाच विजय झाला. यंदा मात्र दादा भुसे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. त्यांचे एकेकाळचे खंदे समर्थक बंडूकाका बच्छाव त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे. तसेच दुसरीकडे त्यांचे कट्टर राजकीय हाडवैर असलेले शिवसेना (उद्धव ठाकरे) उमेदवार अद्वय हिरे आहे. यामुळे आता ही लढत तिरंगी होणार आहे.
मागील २०१९ मधील निवडणुकीत शिवसेनेचे दादा भुसे आणि काँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे यांच्यात लढत झाली होती. या लढतीत दादा भुसे यांचा ४७ हजारांच्या मताधिक्याने विजय झाला होता. दादा भुसे यांना १ लाख २१ हजार २५२ मते मिळाली तर तुषार शेवाळे यांना ७३,५६८ मते मिळाली. या मतदार संघात लोकसभेतील चित्र पाहिले तर महायुतीला १,२७,४५४ आणि महाविकास आघाडीला ७२,२४२ मते मिळाली. लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास दादा भुसे यांचा विजय सोपा आहे. परंतु आता बंडूकाका बच्छाव यांचे आव्हान त्यांच्या समोर आहे.
उमेदवाराचे नाव | मते |
भुसे दादाजी दगडूशिवसेना (SHS) | 121,252 |
डॉ.तुषार रामकृष्ण शेवाळेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) | 73,568 |
आनंद लक्ष्मण आढावबहुजन समाज पक्ष (BSP) | 2,568 |
नोटाNone of the Above | 1,485 |
अबू गफ्फार एम. इस्माईल अपक्ष (IND) | 1,199 |
प्रशांत अशोक जाधव उर्फ पिंटू पाटील अपक्ष (IND) | 981 |
मच्छिंद्र गोविंद शिर्के अपक्ष (IND) | 956 |
काशिनाथ लाखा सोनवणे अपक्ष (IND) | 666 |
कमालउद्दीन रियासत अली अपक्ष (IND) | 488 |
अब्दुल रशीद मोहम्मद इझार अपक्ष (IND) | 305 |
मालेगाव बाह्यपेक्षा मालेगाव मध्य मतदार संघ वेगळा आहे. या ठिकाणी मुस्लिम बहुल वस्ती आहे. सुमारे ९८ टक्के मुस्लिम मतदार आहे. यामुळे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनाला पाय रोवतासुद्धा आले नाही. गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला या ठिकाणी एक हजार मतांचा टप्पा गाठणे अवघड होत आहे. या मतदारसंघात १९९० पासून भाजप आणि शिवसेनेने उमेदवार दिले आहे. परंतु भाजपला कधी यश मिळवता आले नाही. यामुळे २०१४ मध्ये ही जागा शिवसेनेकडे दिली गेली होती. त्यावेळी शिवसेनेने मुस्लिम उमेदवार दिला. परंतु त्यालाही अवघे १ हजार ३७५ मिळाली होती. त्यानंतर भाजपनेही २००९ मध्ये मुस्लिम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यालाही अवघी ७९५ मते घेता आली. यामुळे यंदा भाजपने उमेदवारच दिला नाही.
लोकसभा निवडणुकीचा धडा भाजपने घेतला. अन्य पाच विधानसभा मतदार संघांमध्ये भाजप उमेदवारास लोकसभा निवडणुकीत आघाडी होती. परंतु एकट्या मालेगाव मध्य मतदार संघात एक लाख ९४ हजार मतांनी भाजप उमेदवार सुभाष भामरे यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला. यामुळे मैदान गाठण्यापूर्वीच महायुतीने या ठिकाणी माघार घेतली. महायुतीचा एकही उमेदवार या मतदार संघात नाही.
एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांनी २०१९ च्या निवडणुकीत बाजी मारली होती. त्यांना १ लाख १७ हजार २४२ मते मिळाली होती. तसेच काँग्रेस उमदेवार आसिफ शेख रशीद यांना ७८ हजार ७२३ मते मिळाली होती. बाकी उमेदवारांची अमानत रक्कम जमा झाली. दोन वर्षांपूर्वी आसिफ शेख यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शेख यांनी शरद पवार गटाला साथ दिली. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. ही जागा काँग्रेसला जाणार असल्यामुळे शेख राष्ट्रवादीतून बाहेर पडले. सुरुवातीला ते शरद पवार गटासोबत होते. परंतु त्यांचे अजित पवार यांच्याशी संबंध आहे. मध्यंतरी मालेगाव दौऱ्यावर अजित पवार आले होते. त्यावेळी त्यांनी शेख यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. परंतु आता अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत असल्यामुळे त्या पक्षाकडून तिकीट घेण्यापेक्षा अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय आसिफ शेख यांनी घेतला.
मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिकऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) | 117,242 |
आसिफ शेख रशीद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) | 78,723 |
दिपाली विवेक वारुळेभारतीय जनता पक्ष (भाजप) | 1450 |
नोटा | 1,143 |
सय्यद सलीम सय्यद अलीम उर्फ पसू भाई अपक्ष (IND) | 412 |
अब्दुल खालिक गुलाम मोहम्मद अपक्ष (IND) | 395 |
रिझवान भाई बेटेरी वालाअपक्ष (IND) | 367 |
ए हमीद कला गांधी अपक्ष (IND) | 152 |
माहेर कौसर मो लुकमान अन्सारी अपक्ष (IND) | 126 |
अब्दुल वाहिद (वाहिद शिंपी)अपक्ष (IND) | 110 |
रौफ बाबा खान अपक्ष (IND) | 66 |
आता मालेगाव मध्ये मतदार संघात १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. परंतु प्रमुख लढतीत एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक, काँग्रेसचे उमेदवार एजाज बेग, समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद आणि अपक्ष आसिफ शेख या चार प्रमुख उमेदवारांमध्ये लढत आहे. मतदारसंघात तीन राष्ट्रीय पक्ष लढत देत असताना भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाने माघार घेतल्याने त्याचीही चर्चा सुरू आहे. भाजपच्या सुरेखा पाटील-भुसे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मच मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज छाननीत बाद झाला होता.
महाविकास आघाडी आणि महायुती जागा वाटपाच्या चर्चेत एकेक जागेसाठी रस्सीखेच सुरु होती. परंतु महायुतीत मालेगाव मध्य मतदार संघाबाबत उलट स्थिती होती. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या कोणीही या जागेवर दावा करत नव्हता. या ठिकाणी हिंदुत्वादी भूमिका चालणार नाही, हे लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेने अजित पवार गटासाठी ही जागा सोडली. परंतु ते भाजप-शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षांना साथ देत असल्याने त्यांना उमेदवारच मिळाला नाही. यामुळे ही निवडणूक महायुतीच्या उमेदवारविना होणार आहे. परंतु या ठिकाणी महायुतीने अद्याप कोणाला पाठिंबाही दिला नाही.
राज्यातील लक्षवेधी लढत घराणेशाही, नातेवाईकांमध्ये लढत, बलाढ्य उमेदवार यामुळे चर्चेत आहे. परंतु मालेगावच्या लढती त्या ठिकाणी सामाजिक परिस्थितीमुळे चर्चेत असतात. एकीकडे हिंदू मतदार तर दुसऱ्या मतदार संघात मुस्लीम मतदार आहे. आता मध्य मध्ये मुस्लीम मतदार पुन्हा एमआयएमला साथ देतात की काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या बाजूने उभे राहतात, हे २३ नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे.