मनोहर शेवाळे, मालेगाव : मालेगावात करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली एका संस्थेकडून रविवारी धर्म परिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला गेला. हा प्रकार उघड झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यानंतर पोलिसांनीही कारवाई करत महाविद्यालय प्रशासन, उपप्राचार्यासह आयोजकांवर गुन्हा दखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी या आरोपाची गांभीर्याने दखल घेतली आहे. राज्यातील काही शहरांमध्ये मागील आठवड्यांपासून तणावाचे वातावरण आहे.
कोणत्या संस्थेकडून झाला कार्यक्रम
मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात पुण्यातील ‘सत्य मलिक लोक सेवा ग्रुप’ कडून अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर गाईडन्स’ चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात इतर धर्मीय मुलांनाही मुस्लिमांप्रमाणे शिक्षण करण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप झाला. यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी कार्यक्रमस्थळी धाव घेत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी गुन्हा दाखल
मालेगावातील प्रकार उघड झाल्यानंतर सोमवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महाविद्यालय प्रशासन, उपप्राचार्यासह आयोजकांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान शहरात त्या महाविद्यालयात गोमूत्र शिंपडून पवित्र करणार असल्याची माहिती हिंदू संघटनांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी
मालेगावात काल झालेल्या घटनेचे पडसाद सोमवारी उमटले. सोमवारी विद्यार्थी रस्त्यावर आले. महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांची जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मालेगाव कॉलेज रोडवर विद्यार्थ्यांची जोरदार घोषाणाबाजी करत कारवाईची मागणी केली.
पोलिसांना आरोप
पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात सुमारे दोन तास ठाण मांडत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले.
राज्यात तणावाचे वातावरण
मागील आठवड्यापासून राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात तणाव निर्माण झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण बिघडल होते. कोल्हापूरात संचारबंदी लागू करत इंटरनेट सेवाही बंद केली होती. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये तणाव होता. अमळनेरमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली होती. या प्रकारावरुन विरोधकांनी सरकारवर आरोप सुरु केले आहे.