देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठा बातमी समोर येत आहे. संसदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान आज संसदेबाहेर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने संसदेबाहेर येत स्वत:वर अंगावर ज्वलनशील द्वाव्य टाकून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आंदोलक नेमका कोण होता? त्याने असं का केलं? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दरम्यान, संबंधित व्यक्तीने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर संसदेबाहेरील पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. या घटनेत संबंधित व्यक्ती जखमी झालीय. त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांना घटनास्थळी पेट्रोलही मिळालं आहे.
संबंधित प्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरु आहे. घटनास्थळी आता फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. संसद भवन हे संवेदनशील ठिकाण आहे. इथे देशभरातील लोकप्रतिनिधी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी येतात. दिग्गज नेतेमंडळी नेहमी इथे येतात. देशाच्या दृष्टीने हा परिसर अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. अशा परिसरात इतकी सुरक्षा असताना अशाप्रकारची घटना घडू कशी शकते? असा प्रश्न उपस्थित होतोय. या घटनेचं गांभीर्य ओळखून आता घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे. या टीमकडून सखोल चौकशी केली जात आहे.
पोलिसांना घटनास्थळी अर्धी जळालेली दोन पानी चिठ्ठी मिळाली आहे. पोलिसांनी जखमी व्यक्तीला तातडीने वाचवण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्तीने रेल्वे भवन जवळ स्वत: ला पेटवून घेतलं. त्यानंतर तो आगीच्या ज्वाळांमध्ये पेटत संसद भवनाच्या दिशेला पळत आला. यावेळी संसद भवन बाहेर असलेल्या पोलिसांनी त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकले. त्याला लागलेली आग विझवण्याचे तातडीने शर्थीने प्रयत्न करण्यात आले. ती आग विझल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे.
दिल्ली पोलिसांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “संबंधित प्रकरण बागपत येथील वैयक्तिक शत्रुत्वाशी संबंधित आहे. या प्रकरणी तपास सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.