मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या मंगेश चिवटे यांना भोवळ आली आहे. मंगेश चिवटे हे सरकारच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधी आहेत. मनोज जरांगे पाटील नवी मुंबई येथे आहेत. तिथे त्यांची सभा सुरु आहे. ही सभा सुरु होण्यापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्याव, ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. त्यातल्या सगे-सोयरे या शब्दावरुन सगळ अडलं आहे. सगे-सोयरे शब्दाचा जीआरमध्ये समावेश करावा ही जरांगे पाटील यांची मागणी आहे. कारण त्यामुळे आणखी काही लाख मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळू शकतो.
याच मुद्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि शिंदे सरकारमध्ये मागच्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आज हजारोंचा जनसमुदाय आहे. त्या सगळ्यांनी मुंबईत येऊ नये. त्यांना मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी सरकारकडून त्यांच्यासोबत मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत.पण अद्यापपर्यंत त्यात यश आलेलं नाही.
आता त्यांची प्रकृती कशी आहे?
मंगेश चिवटे हे सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आज नवी मुंबईत आले होते. इथे प्रचंड गर्दी आहे, सूर्य डोक्यावर आला आहे. या सगळ्याचा त्रास होऊन मंगेश चिवटे यांना चक्कर आली. आता त्यांची प्रकृती कशी आहे? या बद्दल माहिती मिळू शकलेली नाही. नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी प्रचंड मोठा जनसमुदाय जमला आहे. हजारोंच्या संख्येने लोक तिथे आहेत.