महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या सत्ता स्थापनेकडे… महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार? मंत्रिमंडळात कुणा- कुणाचा समावेश असणार? याबाबत चर्चा होताना पाहायला मिळत आहे. तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार? याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तर दिल्ली दरबारी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. अशातच भाजपच्या महिला नेत्याला मुख्यमंत्री करा, अशी मागणी करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या नेत्याने ही मागणी केली आहे.
ओबीसी आरक्षण बचाव समितीचे नेते मंगेश ससाणे यांनी ही मागणी केली आहे. ओबीसींना विरोध करणारा मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. मनोज जरांगे पाटीलचा खुटा ओबीसीने उपटला आहे.महायुतीसाठी ओबीसी समाज निर्णायक ठरला आहे. ओबीसी समाज्याला मुख्यमंत्री पद द्यावं, असं ससाणे यांनी म्हटलं. छगन भुजबळ किंवा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री कराव अशी आम्ही मागणी करतोय महायुतीने याचा विचार करावा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला फटका बसेल. आम्हाला वाटत नाही लक्ष्मण हाके यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल… भेटलं तर स्वागत आहे, असं मंगेश ससाणे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत राज्यात सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. यावेळी 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. यात भाजपचे 10, शिवसेना शिंदे गटाचे सहा तर अजित पवार गटाचे चार आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली असल्याने शिवसेना शिंदे गटाला मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून शिंदे गट आग्रही आहे. तर भाजपला 132 जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा, अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण असणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.