मुंबई: हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी केला होता. शेलार यांच्या या विधानाचा शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी समाचार घेतला आहे. आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला. अन्यथा शिवसैनिक (shivsainik) तुम्हाला पळता भूई सोडणार नाही, असा इशाराच मनिषा कायंदे यांनी दिला आहे. कायंदे यांनी ट्विट करत शेलार यांना हा इशारा दिला आहे. तसेच आतापर्यंत कोरोना परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू सणांना परवानगी दिली आहे. आरोग्याला प्राधान्य दिल्यानेच महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात राहिला आहे, असंही कायंदे यांनी म्हटलं आहे. शेलार यांची टीका आणि कायंदे यांचं त्यावरच प्रत्युत्तर यामुळे हिंदू सणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आगामी काळात आमने सामने येण्याची चिन्हे दिसत आहेत.
आशिष शेलार यांनी आज सकाळी मीडियाशी संवाद साधताना हिंदू सणांवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. मुंबई पोलीसांनी मुंबईत 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्यासाठी आतंकवादी, देशविरोधी शक्ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्ला करतील अशी माहिती पोलिसांकडे आल्याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कमल लावण्यात आले आहे. मात्र याच काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम येतात. म्हणून आमचा सरकारला सवाल आहे की, हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आणि रामभक्तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते? असा सवाल त्यांनी केला. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोन्ही सणांना परवानगी देण्यात याव्यात. या कार्यक्रमात खोडा टाकू नये. आम्ही या मंडळ व समित्यांसोबत चर्चा करीत असून या उत्सवात भाजपा सहभागी होईल, असे आशिष शेलार यांनी म्हटलं होतं.
6 एप्रिल हा भाजपाचा स्थापना दिन असून या निमित्ताने एक व्यापक कार्यक्रम देश पातळीवर हाती घेण्यात आला आहे. भाजपा हा देशातील सर्वात मोठा सेवाकार्य करणारा पक्ष असून जमिनीवर काम करणारा तसेच महाराष्ट्रात सर्वात जास्त जनसमर्थन मिळालेला पक्ष आहे. म्हणून 6 एप्रिलला मुंबईतील प्रत्येक शक्ती केंद्रावर भाजपातर्फे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सकाळी पावणे दहाच्या दरम्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपा पक्ष कार्यकर्ते आणि जनतेला जाहीर संबोधित करणार आहेत. मुंबईत 1500 पेक्षा जास्त ठिकाणी या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 6 एप्रिल ते 14 एप्रिल हा सप्ताह सेवा सप्ताह म्हणून भाजपा देश पातळीवर साजरा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
@ShelarAshish , मा. मुख्यमंत्री यांच्याबद्दल तोंड सांभाळून बोला. अन्यथा शिवसैनिक तुम्हाला पळता भुई सोडणार नाही. आतापर्यंत कोरोना परिस्थिती बघूनच हिंदू सणांना @OfficeofUT यांनी परवानगी दिली आहे. आरोग्याला प्राधान्य दिल्यानेच महाराष्ट्रातील कोरोना कंट्रोलमध्ये राहिला. @AUThackeray pic.twitter.com/bH0gEa0480
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) March 29, 2022
संबंधित बातम्या:
VIDEO: पवारांनी काय केलं ते सोडा, सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली?; अमोल मिटकरींची खोचक टीका